मीरा रोड : मीरा - भाईंदर महापालिका आणि सत्ताधारी भाजप शहरातील प्रामाणिक करदात्यांची थट्टा करत आहे. ज्यांनी प्रामाणिकपणे कर भरला, त्यांना जाहीर केलेली ५० टक्के सवलत अजून दिलेली नाही. पण, जे वर्षानुवर्षे कर थकवत होते, त्यांच्यासाठी पालिकेने गालीचे अंथरून थकीत व्याजाच्या रकमेत तब्बल ७५ टक्के माफीची योजना आणून थकबाकीदारांची चंगळ झाली आहे. मालमत्ताकराच्या थकबाकीदारांपाठोपाठ मोकळ्या जागांच्या थकबाकीदारांनाही २५ कोटींतील ७५ टक्के व्याजमाफीची खैरात अभय योजनेच्या नावाखाली आणली आहे.
मीरा - भाईंदर महापालिकेने १५ मार्च ते ३१ मार्च या कालावधीसाठी मोकळ्या भूखंडाच्या थकबाकीदारांना थकीत व्याजाच्या रकमेत तब्बल ७५ टक्के रक्कम माफ करण्याचे जाहीर केले आहे. मोकळ्या जागांची पूर्ण थकबाकी भरणाऱ्या थकबाकीदारांना घसघशीत लाभ मिळणार आहे. मोकळ्या जागांची चालू वर्षाची व थकबाकी रक्कम तब्बल १०० कोटींच्या घरात आहे. या रकमेत व्याजाची रक्कम २५ कोटी आहे. त्यामुळे बडे बिल्डर, राजकारणी तसेच अन्य थकबाकीदारांच्या बक्कळ फायद्यासाठी ही योजना आणली आहे.
ज्या विकासकांनी मोकळ्या जमिनीचा कर भरला नाही, त्यांना नवीन बांधकामांना परवानग्या देणे बंद करण्यापासून मालमत्ता जप्तीची कारवाई करणे, धाड टाकणे आदी धडक कारवाई पालिकेने करायला हवी होती. प्रशासनासह सत्ताधारी भाजप मात्र या बड्या थकबाकीदारांना पाठीशी घालत आहे. याआधी मालमत्ताकर थकबाकीदारांवर कृपादृष्टी करत २५ फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावधीसाठी ही अभय योजना राबवली होती. मालमत्ता कर थकवणाऱ्या थकबाकीदारांनाही व्याजाच्या रकमेत तब्बल ७५ टक्के माफी दिली.
५० टक्के करसवलतीचा विसर
आर्थिक स्थिती बिकट असूनही शहरातील करदात्यांनी कोरोनाकाळातील लॉकडाऊनमध्ये मालमत्ताकर भरून पालिकेच्या तिजोरीला मोठा आधार दिला होता. सत्ताधारी भाजपने चालू आर्थिक वर्षातील कर वेळेत भरणाऱ्या निवासी व वाणिज्य वापरातील मालमत्तांना ५० टक्के सवलत देण्याचा ठराव केला होता. पण, अशा करदात्यांना ५० टक्के कर सवलत दिली गेलेली नाही. मात्र, थकबाकीदारांना तब्बल ७५ टक्के इतकी व्याजमाफी दिल्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.