भिवंडी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात घर बाधित झालेल्या व्यक्तीला शासनाकडून मिळालेला मोबदला मिळवून देण्यासाठी ७५ लाख रुपये उकळणाऱ्या तीन जणांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रितेश अशोक पाटील ,मेघा गौरव पाटील दोघे राहणार केवणी दिवे व तुफान कमलाकर वैती राहणार कशेळी असे फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांनी संगनमत करून कशेळी येथील निळकंठ बाळाराम म्हात्रे यांचे घर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात बाधित झाले होते. ज्याचा शासकीय मोबदला ३ कोटी ७३ लाख ७९ हजार ६४ रुपये इतका मंजूर झाला होता.
ही शासकीय रक्कम निळकंठ म्हात्रे यांना मिळवून देण्यासाठी गुन्हा दाखल झालेल्या तीनही आरोपींनी ८ नोव्हेंबर २०१८ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत मोबदला मिळवून देण्यासाठी ६० लाख रुपयांचे पोस्ट डेटेड चेक व १५ लाख रुपये रोख रक्कम घेऊन निळकंठ म्हात्रे यांना केवळ १ कोटी ६८ लाख २० हजार ५७९ रुपये अशी केवळ ५० टक्के रक्कम मिळवून दिली होती .तर उर्वरित ५० टक्के रक्कम मिळवून देण्यासाठी आणखी रक्कम दयावी लागेल अन्यथा पैसे मिळवून देणार नाहीत अशी धमकी दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे निळकंठ म्हात्रे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी तिघां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्य पोलीस निरीक्षक श्रीराज माळी करीत आहेत .