नितीन पंडित,भिवंडी: माघी गणेश जयंती निमित्त सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम असतानाच भिवंडी तालुक्यातील अंजूर या गावातील ऐतिहासिक पेशव्यांचे इनामदार असलेल्या नाईक यांच्या नाईकवाड्यातील ३०५ वर्ष पुरातन सिद्धि विनायक मंदिरात मोठ्या उत्साहात माघी गणेशोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी गणेश दर्शन साठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती .
अंजूर येथील गंगाजी नाईक यांच्या वाड्यात तीनशे पाच वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना केली आहे.नाईक वाड्यातील प्रतिष्ठापित या गणपतीची पूजा अर्चना गंगाजी नाईक यांच्या चौदाव्या पिढी कडून सुरु आहे.या ठिकाणी त्याकाळी दळणवळणाची साधने नसल्याने माघी गणेशोत्सव १९५० मध्ये सुरू केला.त्यास यंदा ७५ वर्षे पूर्ण झाले आहेत.यंदा साजरा होत असलेल्या अमृत महोत्सवी माघी गणेशोत्सवात सिद्धिविनायकाच्या दर्शना साठी मुंबई,ठाणे,पुणे,या भागात स्थायिक झालेले नाईक कुटुंबीय खास या गणेश जयंती निमित्त अंजूर गावात येत असतात अशी माहिती श्री सिद्धिविनायक मंदिर अंजूर या विश्वस्त संस्थेचे कार्यवाह संतोष नाईक यांनी दिली आहे.
अंजुरसह भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात दिड व पाच दिवसांच्या गणेश मूर्त्यांची प्रतिष्ठापना मोठ्या प्रमाणात करण्यात आली असून सोमवारी सायंकाळपासून ते मंगळवारी सकाळी ढोल ताशे , डीजे व बँडच्या तालावर वाजतगाजत या गणेशाचे आगमन मोठ्या जल्लोषात तालुक्यात झाले आहे.