- प्रज्ञा म्हात्रे। लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कारागृहात राहूनही अभ्यासाची आवड जोपासणारे बंदी गेल्या १५ वर्षांपासून परीक्षेला बसूनउत्तमोत्तम यश मिळवत आहेत. २००३ पासून सुरू झालेल्या या परीक्षेत आतापर्यंत ७६ बंदी पदवीधर झाले. भविष्यात त्यांच्यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू करण्यात येईल, असे कारागृह प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्याकडून २००३ सालापासून ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदींसाठी परीक्षा घेण्यास सुरुवात झाली. दरवर्षी तिला बसणाऱ्यांची संख्या कमी जास्त होत असते. बंदींसाठी प्रवेशाची फी आकारली जात नाही. त्यांचे आॅफलाईन फॉर्म्स भरले जातात. ज्या कारागृहात केंद्र असते त्याच कारागृहात परीक्षा घेतल्या जातात. ठाणे मध्यवर्ती कारागृह हे त्यापैकी एक आहे. परीक्षेच्या काळात देखरेखीसाठी विद्यापीठाचे पर्यवेक्षक, कारागृहातील गुरूजी असतात. यंदा परीक्षेला प्रथम वर्षासाठी ९, द्वितीय वर्षासाठी १२ तर तृतीय वर्षासाठी ४ बंदी तर गतवर्षी प्रथम वर्षासाठी ३२, द्वितीय वर्षासाठी ८ तर तृतीय वर्षासाठी ६ बंदी बसले होते. गतवर्षीचा आकडा तुलनेने अधिक होता. या तिन्ही वर्षांसाठी गतवर्षी ४६ तर यंदा केवळ २५ बंदी बसले होते. गतवर्षी ४६ बंदींपैकी २८ बंदी उत्तीर्ण झाले होते. यावर्षी घेतलेल्या परीक्षेचा निकाल अद्याप येणे बाकी आहे. ती मागच्या महिन्यात पार पडली, अशी माहीती कारागृह अधिक्षक नितीन वायचळ यांनी दिली. सध्या बंदींना कला आणि वाणिज्य शाखेतून परीक्षा देण्याची सोय आहे. कला शाखेकडे बंदींचा जास्त कल असल्याने या विभागातून परीक्षेला बसणाऱ्या बंदींची संख्या अधिक आहे असे त्यांनी सांगितले. ज्यांना शिकायची इच्छा आहे असे बंदी परीक्षेला बसून वर्षभर अभ्यास करतात आणि त्यांना काही शंका असल्यास कारागृहातील गुरूजींना विचारतात. भविष्यात एम.ए, एम.कॉम हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. त्यामुळे पुढे शिकण्याची इच्छा असलेले बंदी या परीक्षाही देऊ शकतील. सुधारणा आणि पुनर्वसन हे कारागृहाचे ब्रीदवाक्य आहे. जर हे बंदी आतमध्ये राहून शिकले तर कारागृहातून सुटल्यानंतर त्यांना नोकरी मिळण्यास अडचण निर्माण होणार नाही. तसेच, ते शिकल्यास चांगले व सुशिक्षीत नागरिकही बनतील, असा विश्वासही वायचळ यांनी व्यक्त केला. गांधी विचारांच्या परीक्षेत बंदी पासगांधी सर्वोदय मंडळाकडून गांधी विचारांवर दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेला कारागृहातील ९५ बंदी बसले होते. सर्व बंदी पास झाले असून या परीक्षेत ठाणे मध्यवर्ती कारागृहाचा १०० टक्के निकाल लागला आहे.