ठाणे : ठाणे महापालिकेला नवीन जीएसटीकराच्या वसुलीत ७७ कोटी रुपयांची घट सहन करावी लागली आहे. अन्य करांच्या वसुलीसाठी विविध मार्गांचा अवलंब केल्यानंतर मालमत्ताकर, शहर विकास विभाग आदींसह इतर करांची वसुली मागील वर्षीच्या तुलनेत अधिक झाली आहे. परंतु, असे असले तरी दिलेल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रभाग समितीनिहाय वसुलीच्या टीम तयार करून नळजोडण्या खंडित करणे, गरज वाटल्यास जप्तीची कारवाई करणे किंवा वसुलीसाठी बॅण्डबाजा बारात थकबाकीदाराच्या दारात नेऊन थकबाकीदारावरील दबाव वाढवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विविध करांपोटी १ फेबु्रवारी २०१८ पर्यंत १६६७.४८ कोटींची वसुली केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत करवसुलीत १९१.०८ कोटींनी वाढ झाली आहे.ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी थकबाकीच्या वसुलीसाठी विविध विभागांची बैठक घेऊन कशा प्रकारच्या योजना आखल्या आहेत, याची माहिती घेतली. महापालिकेमार्फत यंदा विविध करांची वसुली करण्यासाठी नाना शक्कल अमलात आल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाला वसुलीत यश मिळाले आहे. तसेच मालमत्ताकराच्या विविध लाभकरात वाढ करण्यात आल्याने मालमत्ताकराचे उत्पन्न वाढले आहे. मालमत्ताकर विभागाला यंदा ५०८ कोटींचे लक्ष्य दिले असताना त्यांनी आतापर्यंत २८८.९० कोटींची वसुली केली आहे.मागील वर्षी मालमत्ता विभागाची वसुली २५४.३६ कोटी एवढी होती. गतवर्षीच्या तुलनेत वसुलीतील वाढ ३४.५४ कोटीआहे. स्थानिक संस्थाकर बंद झाला आणि आता जीएसटी लागू झाला आहे. त्यामुळे या करापोटी येणाºया वसुलीत मात्र घट झाली आहे. स्थानिक संस्था करापोटी मागील वर्षी १४६.५१ कोटींची वसुली झाली होती. परंतु, यंदा जीएसटीतून केवळ ६९.४९ कोटींचीच वसुली झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ही वसुली ७७.०२ कोटींनी कमी आहे. शहर विकास विभागाने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ६.८३ कोटींची अधिक वसुली केली आहे.गतवर्षी या विभागामार्फत ३९८.७० कोटींची वसुली झाली होती. यंदा मात्र ती ४०५.५३ कोटींवर गेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चांगलीच आघाडी घेतली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २७.७६ कोटींची अधिक वसुली या विभागाने केली आहे.मागील वर्षी या विभागाने ४९.२३ कोटींची वसुली केली होती. यंदा ७६.९९ कोटींची वसुली झाली आहे. दरम्यान, पाणीपुरवठ्याची वसुली मागील वर्षीप्रमाणेच यंदादेखील अद्यापही पिछाडीवर आहे. गतवर्षीच्या तुलनेत या विभागाची वसुली ३२ लाखांनी कमी झालेली आहे.ही वसुली वाढेल, असा विश्वास संबंधितांनी व्यक्त केला आहे. थकबाकीदारांच्या नळजोडण्या कापण्यासह अनेक कठोर उपाययोजनांचा अवलंब केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. मागील वर्षी पाणीपुरवठा विभागाने ६१.६१ कोटींची वसुली केली होती. यंदा अद्याप ६१.२९ कोटींची वसुली झाली आहे. पालिका तिजोरीत आतापर्यंत १६६७ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.>अद्याप ७७१.९४ कोटींची वसुली बाकीपालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत १६६७.४८ कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गतवर्षी उत्पन्न १४७६.४० कोटी एवढे होते. मागील वर्षीच्या तुलनेत उत्पन्नातील वाढ १९१.०८ कोटी आहे. असे असले तरी आर्थिक वर्षाच्या प्रारंभी सादर केलेल्या अर्थसंकल्पात निश्चित केलेल्या २४३९.४२ कोटी उत्पन्नाच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी पालिकेच्या विविध विभागांकडे आता जेमतेम पावणेदोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. वरील लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी पालिकेला ७७१.९४ कोटींची वसुली करणे बाकी आहे.
जीएसटी वसुलीत ७७ कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 2:49 AM