सुरेश लोखंडे-ठाणे : जिल्ह्यातील गावखेड्यांचा कारभार पाहणाऱ्या १५८ ग्रामपंचायतींच्या एक हजार ४७२ सदस्यांसाठी निवडणुका पार पडल्या. यापैकी एक हजार ४११ विजयी घोषित झाले. यामध्ये ७८६ महिलांनी बाजी मारली असून, जिल्हाभरात केवळ ६२५ पुरुषांना विजयी होता आले.एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या १५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. प्रत्यक्षात १४३ ग्रामपंचायतींच्या ९९४ सदस्यांसाठी मतदान होऊन निवड झाली. आठ ग्रामपंचायतींचे ४१७ सदस्य बिनविरोध निवडून आले. उर्वरित ठाणे तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या ६१ सदस्यांसाठी उमेदवारी अर्ज न आल्यामुळे या गावपाड्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली नाही. एकूण १४११ सदस्यांनी विजयश्री खेचून आणली. यामध्ये ७८६ महिलांनी विजयी होऊन गावाची सत्ता हस्तगत केली आहे. त्यांच्या तुलनेत जिल्ह्यात ६२५ पुरुष विजयी झाले आहेत. या निवडणुकीद्वारे ग्रामपंचायतींच्या सत्तेत महिला प्रबळ असल्याचे उघड झाले आहे. भिवंडी तालुक्यात ५६ ग्रामपंचायतींच्या ५७४ सदस्यांसाठी निवडणुका झाल्या. यापैकी ३१७ महिला सदस्य विजयी झाल्या. यात बिनविरोध निवड झालेल्या पाच ग्रामपंचायतींच्या सदस्यांचाही समावेश आहे. या तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज आले नाहीत. मुरबाड तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींच्या ३३८ सदस्यांसाठी निवडणूक झाली. यामध्ये १९१ महिला विजयी झाल्या आहेत. कल्याण तालुक्यातही हीच स्थिती आहे. येथील २१ ग्रामपंचायतींच्या १११ सदस्यांपैकी २१६ महिलांचा विजय झाला आहे. अंबरनाथ तालुक्यामधील २७ ग्रामपंचायतींच्या २४७ सदस्यांमध्ये १३४ महिलांनी विजयश्री खेचून आणली. शहापूरच्या पाच ग्रामपंचायतींच्या ५१ सदस्यांपैकी २८ महिला सदस्यांनी बाजी मारली.
गोरेगाव ग्रामपंचायतीत सर्वाधिक महिलाजिल्ह्यात सर्वात लहान ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या मुरबाड तालुक्यातील चिरड येथील सात सदस्यांपैकी पाच महिला सदस्यांनी विजय मिळवून महिलाराज प्रस्थापित केले. अंबरनाथ तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायतीत नऊ सदस्यांची बिनविरोध निवड झाली. त्यात सहा महिला आहेत. येथील मुस्लीम महिला सदस्यांचे नेतृत्व वाखाणण्याजोगे आहे.
लोकहिताची कामे प्राधान्याने करण्याची महिला सदस्यांची ग्वाही -ग्रामपंचायतीचे मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाल्याने समस्यांची वानवा नाही. पुढील पाच वर्षांत पक्के अंतर्गत रस्ते, सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी उत्तम गटार व्यवस्था व सर्व सदनिकाधारकांना मुबलक पाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू.- ज्योती प्रशांत भोईर, सदस्या, ग्रामपंचायत चेरपोली, ता. शहापूर
मी कातकरी आदिम जमातीतून अनुसूचित जमाती महिला राखीव जागेवर विजयी झाली आहे. मला श्रमजीवी संघटनेचे पाठबळ मिळाले आहे. या संधीतून मी गावाचा सर्वांगीण व पर्यावरणपूरक विकास साधण्याचा प्रयत्न प्राधान्याने करेल. श्रमजीवी संघटनेच्या शिस्तबद्ध आणि लोकहिताच्या मार्गाने येत्या काळात मुबलक पाण्यासह रस्ते, दिवाबत्ती आदी कामे प्राधान्याने करेन.- लक्ष्मी मुकणे, सदस्य, ग्रामपंचायत वारेट, खातिवली, ता. भिवंडी
बिनविरोध निवडून देत माझ्यावर गावाच्या विकासासाठी विश्वास टाकला आहे. माझ्या यशाची ही पहिली पायरी आहे. मी गावातील महिलांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबविण्यासह बचत गटाच्या माध्यमातून उद्योग-व्यवसायाला चालना मिळावी म्हणून मी प्रयत्नशील राहीन. शिलाई मशीन प्रशिक्षण, गृहउद्योगाची निर्मिती करून महिलांचे सबळीकरण करेन. शासनाच्या विविध योजनांची ग्रामपंचायत स्तरावर काटेकोरपणे अंमलबजावणी करेन.- अक्षता वाघचौडे, सदस्या, ग्रामपंचायत खांडपे, ता. मुरबाड