जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : एका ग्रुपद्वारे गुंतवणूक केल्यास जादा नफा दिला जाईल, असे आमिष दाखवून ठाण्यातील २७ वर्षीय व्यावसायिकाची आठ लाख ७७ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समाेर आला आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती ठाणेनगर पाेलिसांनी रविवारी दिली.
ठाण्याच्या खारटन राेड भागात राहणाऱ्या या व्यापाऱ्याला २ जानेवारी राेजी सकाळी नऊच्या सुमारास एका अनाेळखी महिलेने मधाळ आवाजात फाेन केला. त्यानंतर तिने एमसी स्टाॅक क्लब डी वन या ग्रुपद्वारे गुंतवणूक केल्यास माेठा फायदा हाेईल, अशी त्याला गळ घातली. या महिलेने बाेलण्यात गुंतवून विश्वासात घेतल्यामुळे माेठा लाभ हाेईल, असा समज या व्यापाऱ्याचा झाला. तिने तिच्या स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा या बँक या खात्यात आठ लाख ७७ हजारांची रक्कम ऑनलाइन वळती करण्यास सांगितली. ती परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेविरुद्ध फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली ठाणेनगर पाेलिस ठाण्यात ३० ऑगस्ट राेजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.