- अनिकेत घमंडी
डोंबिवली: केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी आवाहन केल्यानंतर नागपूर महानगरपालिकेने ज्या पद्धतीने डांबरीकरणाचे रस्ते करण्यासाठी शहरातील घनकच-यामधून गोळा केलेल्या प्लास्टिकच्या कच-यावर प्रक्रिया करुन त्यापासून डांबर बनवून त्याचा वापर केला होता. तीच संकल्पना कल्याण-डोंबिवलीमधील रस्त्यांसाठीही वापरण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचा पवित्रा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केला.
त्यामुळे शहरातील घनकच-यामधील प्लास्टिकच्या कच-याची काही अंशी विल्हेवाट लागेल, आणि डांबरीकरणात ते वापरल्याने त्याचे विघटन करणे सहज सुलभ होऊ शकते असेही ते म्हणाले. शनिवारी श्री गणेश मंदिर संस्थानाने आयोजित केलेल्या वेबीनार उपक्रमांतर्गत विविध विषयांवर भाष्य करतांना गडकरी यांनी स्पष्ट केले होते की, रस्त्यांच्या कामामध्ये ८ टक्के प्लास्टिकचा वापर हा डांबरीकरणाच्या कामात मजबुती आणण्यासाठी केला जाऊ शकतो, तसे विशेष निर्देशही दिले आहेत. त्यानूसार आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करत केंद्राच्या सहाय्याने नागपूर महापालिकेने रस्ते बनवले आहेत. सध्या तर सर्व महापालिकांना प्लास्टिकची समस्या भेडसावते ती कमी करण्यासाठी या उपायाचा अवलंब होऊ शकतो, असे गडकरींनी आवाहन देखिल केले होते.
ते पुढे म्हणाले होते की, जर डांबर ४५ रुपये किलोने येत असेल तर प्लास्टिकने ८ रुपये किलोने उपलब्ध होते. त्यामुळे हे तुलनेने पाच पट स्वस्त पडते. त्यावर केंद्राच्या अशा चांगल्या प्रस्तावसाठी केडीएमसी कधीही तयार असल्याचे महापौर देवळेकर यांनी बुधवारी लोकमतशी बोलतांना म्हणाले. या प्रस्तावासंदर्भात त्यांनी रस्ते बांधणी प्रकल्पात तज्ञ असलेल्या व्यक्तिंसमवेत तात्काळ चर्चा केली. आणि गडकरींचा हा प्रस्ताव तातडीने अंमलात आणत असल्याचे म्हंटले. त्यावेळी स्थायीचे सभापती राहुल दामले, सभागृह नेते राजेश मोरे हे देखिल देवळेकर यांच्यासमवेत उपस्थित होते.