कल्याण : शिवाई बालक मंदिर ट्रस्टतर्फे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कल्याण तालुका शिवाई आंतरशालेय वर्षा मिनी मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे ८ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. मॅरेथॉनचे यंदाचे हे चौदावे वर्ष असून प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीदेखील विद्यार्थ्यांचा उत्साह कायम दिसून आला. यात विशेष (गतिमंद) मुलांनी घेतलेला सहभाग हे स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले.कल्याण तालुक्यातील ८८ शाळांमधील ७ हजार ९६७ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ८ ते १८ वयोगटांत ५ हजार ८५ मुले तर २ हजार ७९२ मुलींनी दौड लगावली. क्षितिज आणि अस्तित्व या अपंग आणि गतिमंद शाळांतील ९० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. सर्वात मोठ्या १६ ते १८ वयोगटांच्या मुलांसाठी असलेल्या १० किमी स्पर्धेत प्रथम क्रमांक अक्षय टेंबे, द्वितीय क्रमांक प्रेम यादव (दोघेही बिर्ला महाविद्यालय), तर तिसरा क्रमांक प्रदीप सिंग (के.ग. केतकर महाविद्यालय) याने पटकाविला. मुलींसाठी असलेल्या ७ किमी स्पर्धेत अपूर्वा सायकर (प्रथम), योगिता बडगुजर (द्वितीय) आणि (तृतीय) गीता शेलवले (तिघीही के.व्ही. पेंढरक र महाविद्यालय) यांनी यश मिळविले. प्रत्येक गटासाठी १० बक्षिसे ठेवण्यात आली होती. प्रथम क्रमांकासाठी सायकल, द्वितीय क्रमांकाला स्पोर्ट्स शूज तर तृतीय क्रमांकासाठी स्पोर्ट्स बॅग आणि प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप होते. विशेष मुलांसाठी आयोजित केलेल्या १ किमी स्पर्धेत प्रथम क्रमांक जतीन कदम (अस्तित्व शाळा), द्वितीय क्रमांक रतन गुडेकर (क्षितिज शाळा) आणि रोहित जाधव (अस्तित्व शाळा) याने तिसरा क्रमांक पटकाविला.या स्पर्धेला मॅरेथॉनपटू सुरेश ठाकूर, सायकलपटू विनोद पुनामिया आदींची उपस्थिती लाभली होती. (प्रतिनिधी)
८ हजार विद्यार्थ्यांची दौड
By admin | Published: July 27, 2015 2:56 AM