लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरारोडच्या नया नगर मधील बेकायदा फेरीवाल्यांच्या ८० हातगाड्या सोमवारी महापालिकेने जेसीबीने मोडून काढल्या . यावेळी काही महिलांनी पालिकेच्या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला.
नया नगर मधील बाणेगर शाळा मार्गवर बेकायदा फेरीवाल्यांचा उच्छाद मोठ्या प्रमाणात असल्याने परिसरातील रहिवाशी त्रस्त झाले आहेत . ह्या फेरीवाल्यांच्या गुंडां कडून तक्रारी करणाऱ्या रहिवाश्याना धमकावण्यासारखे प्रकार घडले आहेत . तर पालिकेच्या पथकास सुद्धा ह्या फेरीवाल्यांची दांडगाई सहन करावी लागते .
सोमवारी महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या आदेशा नंतर उपायुक्त मारूती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली . अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण , प्रभाग अधिकारी योगेश गुनिजन , कनिष्ठ अभियंता सुदर्शन काळे , फेरीवाला पथक प्रमुख सचिन साळुंके, मुरली
पाटील, भैरू नाईक, लिपिक महेश गावंड , पोलिस निरीक्षक माणिक पाटील सह महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान , मजूर यांच्या पथकाने फेरीवाल्यांच्या ८० हातगाड्या जप्त केल्या . नंतर जेसीबीने त्या हातगाड्या मोडून काढण्यात आल्या . या आधी देखील पालिकेने येथील हातगाड्यांवर अशी कारवाई केली आहे . तरी बक्कळ धंदा असल्याने फेरीवाले व त्यांच्या मागील माफिया हे पुन्हा गाड्या लावून रस्ते बळकावतात .
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"