डोंबिवली : चोरीच्या गुन्ह्यांत हस्तगत केलेला ८० लाखांचा मुद्देमाल मंगळवारी टंडन रोडवरील ठाकूर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात तक्रारदारांना परत करण्यात आला. पोलीस आयुक्त ठाणे शहरांतर्गत पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ मध्ये पोलीस सहआयुक्त दत्तात्रेय कराळे, कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे आणि त्यांच्या चमूने ९० गुन्हे उलगडले होते.
या कार्यक्रमाला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते. पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांनी गुन्ह्याची उकल झाली की, सगळ्याच पोलिसांमध्ये उत्साह वाढतो. त्यांना स्फूर्ती मिळते, असे सांगितले. तक्रारदारांना त्यांचा दस्तऐवज मिळाला की, पोलिसांवरचा विश्वास वाढतो, असे पानसरे म्हणाले.
शहरातील सीसीटीव्ही गुन्ह्यांची उकल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबरोबरच नागरिकांनीही तिसरा डोळा बनून सतर्क राहावे, असे आवाहनही पोलिसांनी केले. या कार्यक्रमाला तक्रारदारांसह डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त दिलीप राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंग पवार आदीं वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.१ किलो सोने अर्धा किलो चांदीचे दागिने मूळमालकांनाघरफोडी, जबरी चोरी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांतील ९७ तोळे सोन्याचे दागिने, ५१० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने तसेच मोबाइल स्नॅचिंग, चोरी आणि प्रॉपर्टी मिसिंग प्रकरणातील १२० मोबाइल आणि चोरीच्या गुन्ह्यांतील ३४ मोटारसायकली, चारचाकी वाहने व दोन लॅपटॉप असा एकूण ८० लाख रुपये किमतीचा जप्त मुद्देमाल संबंधितांना परत करण्यात आला.