- पंकज पाटील अंबरनाथ : जालना येथील आपले मूळ गाव सोडून उल्हासनगरमध्ये आलेल्या संजय नरवडे याने बंदुकीचा धाक दाखवित एक-दोन नव्हे तर ८० हून अधिक जोडप्यांना लुटल्याचे समोर आले आहे. तरुणाची हत्या करुन त्याच्या प्रेयसीवर बलात्कार करणा-या आरोपीला पकडण्यासाठी एकही पुरावा नसतांना पोलिसांनी अवघ्या सहा दिवसात आरोपीला अटक केली आहे आणि ती करताना आधीच्या गुन्ह्याचा माग काढत त्याच्यापर्यंत पोचण्याची शिताफी दाखवली, ती वाखाणण्याजोगी आहे.अंबरनाथ ते नालंबी या डोंगराळ रस्त्यावर अनेक जोडपी एकांतात बसलेली असतात. त्यातील अनेक जोडपी घरच्यांपासून चोरून आलेली असल्याने त्यांना लुटल्यास ते पोलिसांत तक्रार करणार नाहीत किंवा घरी सांगणार नाहीत, याची खात्री नरवडे याला होती. त्यामुलेच तो एकांतातील जोडप्यांना लक्ष्य करीत असे. संजयची वागणूक अत्यंत वाईट असल्यानेच आई-वडिलांनी त्याला घराबाहेर काढले होते. कोणी घरात घेत नसल्याने त्याने जालन्यावरुन थेट उल्हासनगर गाठले. आधीपासूनच चोरीची सवय असल्याने त्यातून जमविलेल्या २५ हजार रुपयांत त्याने एका गुन्हेगाराकडून रिव्हॉल्व्हर विकत घेतले. हीच बंदुक त्याच्या गुन्हेगारीला वाव देत होती. दिवसभर रिक्षा चालविणारा संजय सायंकाळी ७ नंतर जोडप्यांना लुटण्यासाठी बाहेर पडत असे. त्याने सर्वात आधी जोडपी कोणत्या भागात एकांतात बसतात, याची पाळत ठेवत माहिती घेतली. अंबरनाथ एमआयडीसी, लोकनगरी मैदान, नालंबी रोड, उल्हासनगमधील उद्याने यासह महामार्गावरील अडगळीच्या जागी जोडपी बसतात, याची माहिती त्याने मिळवली. आपली रिक्षा घटनास्थळापासून लांब ठेऊन संजय बंदुकीचा धाक दाखवत अनेक जोडप्यांना लुटत असे. त्यांच्याकडील पैसे, सोने आणि मोबाईल घेऊन पळून जात होता. एकीकडे बंदुकीचा धाक आणि घरात कुणाला माहित नसल्याने बहुतांश जोडपी त्याच्या धमकीला घाबरत आपल्याकडील मौल्यवान वस्तू त्याला देत आणि तक्रारही करत नसत. या प्रकारे सात महिन्यात त्याने ८० हून अधिक जोडप्यांना लुटल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. स्वत:जवळील पैसे संपल्यावर तो लुटमार करण्यासाठी तो बाहेर पडत असे. अनेक लुटमारीच्या घटना त्याने पचविल्या देखील. मात्र त्याने आत्तापर्यंत केलेल्या गुन्ह्यांपैकी दोन गुन्हे हे त्याच्या गुन्हेगारीला पूर्णविराम देण्यास कारणीभूत ठरले.२६ जुलै २०१७ मध्ये अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोकनगरी मैदानावर आकाश घोडके हा तरुण आपल्या मैत्रिणीसह बसला होता. संजयने आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहुन त्यांना बंदुकीचा धाक दाखवित त्यांच्याकडील मोबाईल आणि पैसे घेतले. त्याला आकाशने विरोध करताच त्याच्यावर गोळ््या झाडल्या. सुदैवाने ही गोळी आकाशच्या हाताच्या पंज्यावर लागली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. मात्र या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी जास्त लक्ष न दिल्याने संजयने पुन्हा चोरीच्या घटनांवर आपले लक्ष केंद्रीत केले. जोडपी शोधत तो नालंबी रस्त्यावर अनेकवेळा आला. ५ मार्चला तो पुन्हा त्या ठिकाणी आला, तेव्हा नालंबी रस्त्याच्या शेजारी गणेश आणि त्याची प्रेयसी एकांतात बसले होते. संजयने त्यांच्याकडून पैसे, मोबाईल आणि दुचाकीची चावी मागितली. त्याला विरोध करताच संजयने गणेशला ठार मारत त्याच्या पे्रयसीवर बलात्कार केला आणि तो फरार झाला.या आधी केलेल्या गुन्ह्यांमध्ये हत्येचा प्रकार न घडल्याने पोलिसांनी अशा चोरीच्या प्रकारांकडे नेहमीच दुर्लक्ष केले. मात्र नालंबी येथे गणेशची झालेली हत्या आणि पे्रयसीवर झालेल्या बलात्कारामुले एकच खळबळ उडाली आणि पोलिसांनी गांभीर्याने शोध घेत संजयला अटक केली.>लुटलेल्या मोबाईलद्वारे लावला शोधगणेशची हत्या आणि त्याच्या पे्रयसीवरील बलात्काराचे प्रकरण पोलिसांना आरोपी शोधण्यासाठी आव्हान होते. या प्रकरणाचा शोध घेताना पोलिसांनी घटनाक्रम तपासला. गणेशच्या हत्येनंतर आरोपीने मोबाईल आणि गाडीची चावी नेली होती. प्रेमीयुगलांना लुटण्याचा प्रकार या आधीही शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे समोर आले. तशाच आधीच्या घटना तपासताना ठाणे ग्रामीण गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आकाश घोडके याच्यावर झालेल्या गोळीबाराची माहिती काढली. त्या प्रकरणात आकाशसोबत बोलणे केले. एवढेच नव्हे, तर बलात्कारपीडीत मुलीच्या वर्णनावरून तयार केलेले रेखाचित्र त्याला दाखविले. आकाशनेही त्याला ओळखल्यावर त्याच्यापर्यंत पोचण्याची व्यूहरचना आखण्यात आली. आकाशचा मोबाईल संजयने चोरलेला होता. त्या मोबाईलच्या आयएमईआय नंबरच्या आधारावर त्या मोबाईलचा शोध घेतला. हा मोबाईल पोलिसांना एका महिलेकडे सापडला. तिच्याकडे चौकशी केली असता तो तिला तिच्या भावाने दिल्याचे उघड झाले.तिचा भाऊ गॅरेज चालवतो. चौकशी केल्यावर त्याला हा मोबाईल एका रिक्षाचालकाने विकल्याचे समोर आले. त्याची रिक्षा पेंटिंगसाठी गॅरेजमध्ये आली होती. पण पेंटिंगचे पैसे नसल्याने त्याने गॅरेजवाल्याला त्या बदल्यात मोबाईल दिला होता. जेव्हा गॅरेजवाल्याला रेखाचित्र दाखवले, तेव्हा त्याने संजला ओळखले. त्यामुळे सर्व घटनांची संगती लागली. मग त्याच गॅरेजवाल्याची मदत घेत पोलिसांनी संजयला उल्हासनगरमध्ये बोलावले आणि सापळा रचून पकडले. तेव्हा संजयने या आधीही लूटमार केल्याचे समोर आले आहे. एकंदरीतच हत्या आणि बलात्काराच्या प्रकरणातील आरोपी असलेला संजय घटनास्थळाच्या पुराव्यांच्या आधारे नव्हे, तर आठ महिन्यांपूर्वी केलेल्या गुन्ह्यातील मोबाईलच्या आधारे पकडला गेला.>प्रतिहल्ला चढवल्याने केली हत्यागणेश आणि त्याची प्रेयसी नालंबी रस्त्यावर एकांतात असताना त्यांना लुटण्यासाठी संजय आला, बंदुकीचा धाक दाखवला तेव्हा विरोध केल्याने संजयने गणेशला जोरदार फटका मारला. पण बंदूक असूनही न घाबरता गणेशने संजयवर थेट हल्ला चढवत त्याला मारण्यास सुरुवात केली. त्याच्या प्रेयसीनेही संजयचा गळा आणि केस पकडत त्याला मारहाण केली. त्यामुळे संजयने गणेशवर गोळी झाडली. त्यानंतरही विरोध कायम राहिल्याने त्याला पुन्हा तीन गोळ्या घालत त्याची हत्या केली. गणेशची हत्या केल्यावर पळून न जाता संजयने मारहाणीचा सूड घेण्यासाठी बंदुकीच्या धाकावर तरूणीला रस्त्याखालील झुडपात नेले आणि बलात्कार केला. नंतर त्याने परत घटनास्थळी येऊन टॉर्च लावून गोळ््यांच्या पुंगळ््या गोळा करून मग तो पळून गेला.>एकाच लॉजमध्ये सात महिने मुक्कामसंजय सात महिन्यांपासून प्रशिक या उल्हासनगरच्या लॉजमध्ये रहात होता. पण या काळात कोणीही त्याची चौकशी केली नाही. बंदुक त्याच लॉजच्या लॉकरमध्ये ठेवून तो दिवसभर रिक्षा चालवत असे आणि सायंकाळी बंदुक सोबत घेत लूटमार करत असे.>शिवाजीनगर पोलिसांची हलगर्जीप्रेमीयुगलांना लुटण्याच्या थेट तक्रारी आल्या नसल्या, तरी आकाश घोडकेवर झालेला गोळीबार पाहता शिवाजीनगर पोलिसांनी काळजीपूर्वक तपास करणे गरजेचे होते. पण गोळीबारानंतरही तसा तपास न झाल्याने संजय आणखी गुन्हे करण्यास धजावला. आकाशच्या मोबाईलचे लोकेशन शोधून जरी पोलिसांनी माग काढला असता, तर तेव्हाच संजय त्यांच्या हाती लागला असता आणि ही हत्या, बलात्काराची घटना टळली असती.
सात महिन्यांत त्याने लुटले ८० जोडप्यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 3:47 AM