अलिबाग : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे ८० टक्के मतदान झाले. सर्वत्र मतदान शांततेमध्ये पार पडल्याचा दावा जिल्हा निवडणूक विभागाने केला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नजीब मुल्ला, भाजपाचे निरंजन डावखरे आणि शिवसेनेचे संजय मोरे यांच्यासह अन्य ११ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद झाले. २८ जून रोजी नेरु ळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.रायगड जिल्ह्यातील तब्बल १९ हजार ९१८ मतदार मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र होते. पैकी सुमारे ८० टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ७ वाजता जिल्ह्यातील ३६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रि येला सुरु वात झाली. सकाळी जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसाचा जोर वाढल्याने मतदार घराबाहेर पडण्यास तयार नव्हता. त्यामुळे मतदान संथ गतीने सुरू होते. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्यानंतर मतदानाचा जोर वाढला.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी,भाजपा,शिवसेना या प्रमुख पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची चांगलीच लगबग सुरू असल्याचे दिसून आले. मतदार यादीमध्ये असलेल्या नावाप्रमाणे मतदार मतदान केंद्रात जाऊन मतदान करतात की नाही यावरच त्यांची नजर खिळून असल्याचे दिसून आले.जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान झाल्याचा दावा जिल्हा निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाने सर्वोतोपरी मदत केली होती. त्या उपकाराची परतफेड म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे हे भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे यांना मदत करणार असा गौप्यस्फोट शिवसेनेचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी करून खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मतदान केंद्रावर उलटसुलट चर्चेला ऊत आला होता.
जिल्ह्यात ८० टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 1:56 AM