ठाणे : मागील वर्षी कोरोनामुळे गौरी गणपती उत्सवासाठी चारकमान्यांना कोकणात जाण्यास मिळाले नव्हते. परंतु यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांसाठी ठाणे एसटी विभागामार्फत तब्बल ८०० बसेसचे नियोजन केल्याची माहिती ठाणे एसटी विभागाकडून देण्यात आली आहे. या जादा वाहतुकीचा कालावधी ६ ते १० सप्टेंबर २०२१ असा असून परतीच्या वाहतुकीचा कालावधी हा १४ ते १६ सप्टेंबर असा असणार आहे. ज्या भक्तांना गावी जायचे असेल त्यांनी १५ जुलैपासून आपले आरक्षण बुक करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
कोरोनामुळे एसटीच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आजही एसटीला प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागला आहे. आजही एसटी विभागाची ५१ टक्केच वाहतूक सुरू आहे. त्यातही संपूर्ण क्षमतेने एसटी बसेस बाहेर पडताना दिसत नाहीत. परंतु सध्या कोरोनाचे प्रमाण कमी होऊ लागल्याने एसटीनेदेखील आता कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एसटीच्या ठाणे विभागाकडून तब्बल ८०० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ठाणे एसटी विभागाकडून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी दरवर्षीप्रमाणे आगाऊ संगणकीय आरक्षणाची सोयदेखील करण्यात आलेली आहे. संगणकीय आरक्षणाचा कालावधी हा ६० दिवस आधी एकूण ८०० गाड्यांचे नियोजन या विभागाकडून करण्यात आलेले आहे. त्यानुसार चिपळूण, रत्नागिरी, गुहागर, साखरपा, देवगड, कणकवली, सावंतवाडी, सिंधुदुर्ग अशा मार्गावर रा.प. ठाणे विभागातील बोरीवली, भाईंदर, ठाणे, मुलुंड, भांडुप, कल्याण, डोंबिवली, विठ्ठलवाडी या बसस्थानकावरून बसेस सोडण्यात येणार आहेत. तरी उपनगरातील कोकणवासी गणेशभक्त व कोकण गणेश मंडळे यांनी ठाणे विभागातील आगाराशी संपर्क साधण्यात यावा व सुरक्षित प्रवासाकरिता एस.टी. बसनेच प्रवास करण्याबाबत ठाणे एसटी विभागाने आवाहन केले आहे. त्यानुसार गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी एसटी विभागातील बसस्थानकावरील आरक्षण खिडक्या २४ तास सुरू राहणार आहेत. त्यानुसार ६० दिवस आधी जाण्याचे बुकिंग करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. कोकणात जाण्यासाठी आरक्षण बुकिंग हे १५ जुलै ते १९ जुलै २०२१ या कालावधीत सुरू होणार आहे. यावर्षीच्या गौरी-गणपतीत जादा वाहतुकीसाठी ६ सप्टेंबर ते १० सप्टेंबरपर्यंत ८०० गाड्य़ा सोडल्या जाणार आहेत.