डोंबिवली : केंद्र सरकारच्या नॅशनल मेडिकल कमिशन बिलाविरोधात निषेध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) डोंबिवली शाखेतर्फे शनिवारी सकाळी ६ ते सायंकाळी ६ दरम्यान वैद्यकीय सेवा बंद ठेवून धिक्कार दिन पाळण्यात आला. कल्याणमध्येही डॉ. म्हसकर हॉस्पिटलबाहेर निदर्शने करण्यात आली. या दोन्ही शहरांमधील ८०० डॉक्टरांनी सहभाग घेत ३५० दवाखाने व रुग्णालये बंद ठेवली होती.आयएमएच्या डोंबिवली शाखेच्या अध्यक्षा डॉ. अर्चना पाटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केवळ श्रीमंतांसाठी हा आरक्षण कायदा असल्याने त्याचा धिक्कार करण्यात येत आहे. या विधेयकातील चुकांसंदर्भात आम्ही खासदारांच्या बैठका घेतल्या. केंद्राच्या वैद्यकीय सेवांसंदर्भातील सचिव, मंत्र्यांसमवेत चर्चा केली. पंतप्रधान वेळ देत नाहीत. त्यांची भेट व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण, आमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा न करता, ते विधेयक कायम करण्यात येत आहे. सोमवारी ते लोकसभेत चर्चेला येणार आहे. त्यामुळे देशभर धिक्कार दिन पाळून सरकारला यासंदर्भात संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे आयएमएचे राष्ट्रीय सचिव डॉ. मंगेश पाटे यांनी सांगितले.दरम्यान, पत्रकार परिषदेप्रसंगी डॉ. वंदना धाकतोडे, डॉ. सुनीत उपासनी, डॉ. संजय पृथ्वी, डॉ. विजय आगे आदी उपस्थित होते.बिल लादण्याचा प्रयत्नधिक्कार दिनामुळे रुग्णांची गैरसोय होऊ शकते, पण त्याला आयएमए नाही, तर केंद्र सरकारचे धोरण जबाबदार आहे, असे पाटे म्हणाल्या. नॅशनल मेडिकल कमिशन बिल हे नागरिकांवर लादण्यात येत आहे, अशीही टीका त्यांनी यावेळी केली.
धिक्कार दिनात ८०० डॉक्टरांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 3:25 AM