मीरारोड - मीरा भाईंदर शहरातील सुमारे ८०० पथदिवे बंद असल्याच्या प्रकरणी महापौर ज्योत्सना हसनला यांनी अदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उजळणी घेतली. यावेळी २५ सप्टेंबर पर्यंत बंद असलेले सर्व पथदिवे सुरू केले जातील असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
शहराचा मुख्य रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर मेट्रो मार्गाचे काम सुरू असल्याने येथील पथदिवे बंद आहेत. या शिवाय शहरातील अनेक रस्ते - गल्लीबोळातील पथदिवे बंद असून पथदिवे बंद असण्याच्या तक्रारी वाढत आहेत. यामुळे अंधारात वाहन चालवणे वा चालत जाणे जिकरीचे झाले असून लोकांना भीती देखील वाटत आहे.
महापौर ज्योत्सना हसनाळे यांनी रस्त्यांवरील पथदिव्यांची जबाबदारी असणाऱ्या अदानी वीज पुरवठा कंपनीच्या अधिकाऱ्यांची महापौर दालनात बैठक बोलावली होती. यावेळी सभागृह नेते रोहिदास पाटील , उपमहापौर हसमुख गेहलोत, स्थायी समिती सभापती अशोक तिवारी, शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता दीपक खांबित, अदानीचे अधिकारी कैलास शिंदे, दत्तात्रय पाथरवट, दया सामंत, विकास आंब्रे उमेश लुदीर उपस्थित होते.
यावेळी मेट्रोच्या कामामुळे मुख्य मार्गावरील पथदिवे बंद असल्याचे कंपनीने सांगितले असता महापौरांनी रस्त्याच्या कडेला पथदिवे उभारा असे सांगितले. यावेळी शहरातील बंद असलेले ८०० दिवे २५ सप्टेंबर पर्यंत सुरू करणार असे आश्वासन कंपनीने दिले. शहरातील सर्व जुने दिवे एलईडीमध्ये बदलण्यात यावेत यावर चर्चा करण्यात आली.
या शिवाय राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस मार्गावरील दिवे त्वरित सुरु करण्यात यावेत. चेणे - काजूपाडा या आदिवासी भागात महावितरणचा वीज पुरवठा असल्याने वीज सुविधा अखंड मिळत नाही म्हणून या भागात अदानीने वीज पुरवठा करावा. तसेच येथील पथदिवे अदानीने ताब्यात घेऊन त्यावर एलईडी दिवे बसवावेत. शहरात या पुढे नव्याने बसविण्यात येणारे पथदिवे हे एलईडी दिव्यांचे बसवावेत. झोपडपट्ट्यांमध्ये ३ मीटर पेक्षा कमी गल्ल्यात पथदिवे बसवावेत असे निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
"भाभीजी के पापड' खाऊन कोरोना बरा होतो का?", संजय राऊतांचा भाजपाला सणसणीत टोला
Video - "या' गर्दीत कोरोना होत नाही असा सरकारचा समज आहे का?', मनसे नेत्याचा सवाल
भाजपा मंत्र्यांनी सरकारी गाडीवर लावला उलटा 'तिरंगा' अन्...