- लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करण्याच्या घोषणा राज्यकर्ते वेळोवेळी करीत असले तरी, निवडणुका आल्या की गुन्हेगारांनाच उमेदवारी देतात, याचाच प्रत्यय भिवंडी निजामपूर महापालिका निवडणुकीत आला आहे. एकूण ९० जागांकरिता होणाऱ्या या निवडणुकीत रिंगणात असलेल्या ४५१ उमेदवारांपैकी १८ टक्के म्हणजे ८२ उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.२४ मे रोजी होणाऱ्या भिवंडी निजामपूर महापालिकेच्या ९0 जागांसाठी ४५८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. नवी दिल्ली येथील असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मस् (एडीआर) आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच या संस्थेने ४५८ पैकी ४५१ उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास केला. त्यांच्या निष्कर्षानुसार, ८२ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षेची तरतूद असलेले गुन्हे, अजामीनपात्र गुन्हे, तसेच भ्रष्टाचार, बलात्कार, अपहरण किंवा खुनासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले ६१ उमेदवार (१४ टक्के) निवडणूक रिंगणात आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची पक्षनिहाय आकडेवारी विचारात घेतल्यास त्यांचे सर्वाधिक जोरदार स्वागत काँग्रेसने केल्याचे दिसते. या पक्षाचे ६४ पैकी १९ म्हणजेच ३0 टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. त्याखालोखाल समाजवादी पक्षाचे २६ टक्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ टक्के तर शिवसेना आणि बसपाचे प्रत्येकी २0 टक्के उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. पारदर्शक कारभाराचा दावा करणाऱ्या भाजपानेही १४ टक्के गुन्हेगारांना तिकीटे दिली आहेत. अपक्षांमध्ये हे प्रमाण १२ टक्के आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांचा सर्वाधिक भरणा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. या पक्षाने अशा २२ टक्के उमेदवारांना, तर त्याखालोखाल २0 टक्के उमेदवारांना काँग्रेसने संधी दिली आहे. समाजवादी पक्षात हे प्रमाण १९ टक्के, शिवसेनेत १५ टक्के, भाजपामध्ये १३ टक्के तर अपक्षांमध्ये ८ टक्के आहे.निवडणूक रिंगणातील इतर पक्ष आणि आघाड्यांचा रंगही काहीसा असाच आहे. कोणार्क विकास आघाडीचे १६ उमेदवार नशिब अजमावत असून, त्यापैकी ३१ टक्के म्हणजे ५ उमेदवारांवर विविध गुन्हे दाखल आहेत. या आघाडीच्या १९ टक्के म्हणजेच ४ उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. रिपाइं (एकतावादी) च्या पाचपैकी दोन उमेदवारांवर किरकोळ स्वरुपाचे तर दोन उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जदयूचा एकच उमेदवार निवडणूक रिंगणात असून, तोदेखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे, हे विशेष. - निवडणूक रिंगणातील उमेदवारांचा वयोगट पाहता सर्वच पक्षांनी तरुणांना संधी दिल्याचे दिसते. महापालिकेच्या रणसंग्रामातील ४५१ उमेदवारांपैकी ३२ उमेदवार २१ ते २४ वर्षे वयोगटातील आहेत. ६0 उमेदवार २५ ते ३0 वर्षे वयोगटातील, १४२ उमेदवार ३१ ते ४0 वर्षे वयोगटातील, १२0 उमेदवार ४१ ते ५0 वर्षे वयोगटातील, ६९ उमेदवार ५१ ते ६0 वर्षे वयोगटातील आहेत.
भिवंडी मनपा निवडणुकीत ८२ गुन्हेगार रिंगणात
By admin | Published: May 19, 2017 3:59 AM