ठाणे : ठाण्यातील थीम पार्कवर जो काही खर्च झाला आहे, त्यात तब्बल ८२ टक्क्यांपेक्षा जास्त भ्रष्टाचार असल्याचा आरोप सोमवारी भाजपा आ. संजय केळकर यांनी केला. नंदलाल समितीनंतर ठाणे महापालिकेत हा सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचे ते म्हणाले. यामुळे या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेमार्फत करावी, तसेच यासंदर्भात शासनाकडेही दाद मागितली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काही दिवसांपासून बॉलिवूड आणि थीम पार्कचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या प्रकरणाची चौकशी लागली असताना पालिका प्रशासन अथवा सत्ताधाऱ्यांनी या थीम पार्कची पाहणीसुद्धा केलेली नाही. परंतु, सोमवारी आमदार संजय केळकर, भाजपाचे गटनेते नारायण पवार, माजी गटनेते मिलिंद पाटणकर, सुनेश जोशी, कृष्णा पाटील, दीपा गावंड, प्रतिभा मढवी, नम्रता कोळी, स्नेहा आंब्रे, कमल चौधरी आदींनी ती करून शिवसेनेवर कुरघोडी केली. या पाहणीतच अनेक बाबी समोर आल्या आहेत. या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा, अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा, जेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, चर्च, तलावातील मंदिर आदींसह लॉन व इतर खर्च मिळून भाजपाचे माजी गटनेते मिलिंद पाटणकर यांनी त्रयस्थ संस्थेकडून अंदाजखर्च काढला असता तो जास्तीतजास्त दोन कोटींच्या आसपास जात आहे. याचे पुरावेसुद्धा त्यांनी सादर केले.पालकमंत्री/आयुक्तांची ठेकेदाराशी भेट चुकीची : स्वर्गीय आनंद दिघे यांनी ४२ टक्कयांचा घोटाळा समोर आणल्यानंतर शासनाने नंदलाल समिती नेमली होती. त्यानंतर, हा ८२ टक्कयांचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप केळकर यांनी यावेळी केला. त्यामुळे या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच शासनाकडेही याबाबत दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात ठेकेदाराची चौकशी सुरूअसताना त्याच्याबरोबर पालकमंत्री आणि आयुक्तांनी भेटणे चुकीचे असल्याचे मतही केळकर यांनी व्यक्त केले.