लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : बदलापूर शहराची लोकसंख्या वाढत असून या वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी पाणीपुरवठा योजनेची गरज लक्षात घेऊन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ८२ कोटी रुपये निधी देण्याचे आश्वासन दिले. नगरविकास विभागाने निधीची तरतूद केल्यास पाणीपुरवठा विभाग तत्काळ योजनेचे काम सुरू करील, असे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.
बदलापूर येथील अमृत अभियानांतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या ७. २ द. ल. लि. क्षमतेच्या जलशुद्धिकरण केंद्राचे उद्घाटन शिंदे आणि पाटील यांच्या हस्ते बदलापूरला झाले. यावेळी बदलापूरच्या योजनेसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन उभय मंत्र्यांनी दिले
पाणीपुरवठ्याच्या ८२ कोटी रुपयांच्या योजनेला नगरोत्थानमधून मंजुरी देत असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले. याचबरोबर एमआयडीसीकडून पाच एमएलडी वाढीव पाणी वाढवून देण्यात येईल. नागरिकांच्या गरजा पाहून सेवा पुरविणे ही शासनाची आणि पालिकांची जबाबदारी आहे. वाद बाजूला ठेवून शहराचे हित पाहणे गरजेचे असल्याचे शिंदे म्हणाले. उल्हास खोरे पुनरुज्जीवन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सुरू होणारा पाणीपुरवठा अपुराच असल्याची खंत शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी व्यक्त केली. पाच वर्षांपासून शिवसेना प्रकल्पाचा पाठपुरावा करीत असून, एमआयडीसीकडून पाच एमएलडी अतिरिक्त पाणी मिळाले पाहिजे, अशी मागणी म्हात्रे यांनी केली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, मजीप्राचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, मुख्य अभियंता प्रकाश नंदनवरे, आदी उपस्थित होते.
...........