ठाणे : ठाणे महापालिका आयुक्तांना सादर केलेल्या ३२९९ कोटींच्या मुळ अर्थसंकल्पात स्थायी समितीने ८५ कोटींची वाढ सुचविली आहे. या ४० कोटी ५२ लाख महसुली खर्चात तर ४४ कोटी ४८ लाख भांडवली खर्चात वाढ सुचविण्यात आली आहे. त्यानुसार शहर विकास विभागाकडून वाढीव उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. महापालिकेने शहर विकास विभागाकडून ५०० कोटी ४२ लाखांचे उत्पन्न अपेक्षित धरले होते. आता स्थायी समितीने त्यात ८५ कोटींची वाढ सुचविल्याने शहर विकास विभागाचे उत्पन्नाचे लक्ष हे ५८५ कोटी ४२ लाख झाले आहे. सोमवारी झालेल्या विशेष स्थायी समितीच्या बैठकीत या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता अर्थसंकल्प हा ३ हजार ३८४ कोटींचा झाला असून स्थायी समितीने त्याला मंजुरी दिली आहे. स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर केल्यानंतर स्थायी समितीने अर्थसंकल्पात काही महत्वाचे बदल सुचवले असून यामध्ये ८५ कोटींची वाढ सुचवत ३,३८४ कोटींवर बजेट अंतिम केला आहे. वाढ सुचविण्यात आलेल्या महसुली खर्चामध्ये प्रामुख्याने मोबाईल डायग्नोस्टीक व्हॅनसाठी १ कोटी, पशुजन्म नियंत्रण योजनेसाठी १ कोटी, जंतुनाशकांसाठी ५० लक्ष, महापौर चषक क्रीडास्पर्धांसाठी १ कोटी, इमारतींच्या दुरुस्तीसाठी २ कोटी ५० लक्ष, बीएसयुपी झोपडीधारकांना भाडे देण्यासाठी ५० लक्ष बागांची निगा व देखभालीसाठी १ कोटी, जलवाहिन्या व जलकुंभ दुरुस्तीसाठी १ कोटी, स्मार्ट मीटर देखभाल दुरुस्तीसाठी ३ कोटी, मलवाहिन्या देखभाल व दुरुस्तीसाठी१ कोटी व महापालिका शाळांमध्ये १० योग केंद्र सुरु करणेसाठी ५० लक्ष इत्यादींचा समावेश आहे. सन २०२२-२३ मधील वाढ सुचविण्यात आलेल्या भांडवली कामांसाठी एकात्मिक उदयान विकास कार्यक्रमासाठी २ कोटी, अभ्यासिका बांधणेसाठी १ कोटी, बहुउद्देशीय इमारत बांधणेसाठी १कोटी, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी १ कोटी ७६ लक्ष, विकास आराखडयातील रस्ते नुतनीकरणासाठी ३ कोटी,युटीडब्ल्यूटी रस्त्यांसाठी १० कोटी ५० लक्ष, मैदान विकासासाठी २ कोटी, सार्वजनिक शौचालये बांधणेमध्ये ४ कोटी इत्यादी प्रमुख बाबींमध्ये वाढ सुचविण्यात आलेली आहे.महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र कक्ष तयार करुन खोली 'तीच्यासाठी" ही संकल्पना राबविणेसाठी सार्वजनिक शौचालय बांधणे या लेखाशीर्षामध्ये ५० लक्ष तरतूद राखून ठेवण्यात आली आहे. स्थायी समितीचे अंदाजपत्रक तयार करतांना स्थायी समिती सदस्यांनी जे सहकार्य केले त्याबद्दल सभापती संजय भोईर यांनी सर्वांचे कौतुक केले आहे.
महापालिकेच्या अर्थसंकल्पात ८५ कोटींची वाढ, आता ३३८४ कोटींचं बजेट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 8:33 PM