कल्याण : दिव्यातील साउथ इंडियन शाळेतील दहावीच्या ८५ विद्यार्थ्यांना डोंबिवलीतील जयभारत इंग्लिश शाळेतून बोर्डाच्या परीक्षेला बसवण्यात आले. मात्र, साउथ इंडियन शाळेतील विद्यार्थ्यांच्या लेट फीप्रकरणी ‘जयभारत’ शाळेला राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने सहा लाख ९४ हजार रुपये भरण्याची नोटीस बजावली आहे. अन्यथा, ८५ विद्यार्थ्यांसह ‘जयभारत’ शाळेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल दिला जाणार नाही, असे त्यात म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही शाळांतील विद्यार्थी व पालक धास्तावले आहेत. शाळा व्यवस्थापनाच्या चुकीचा फटका विद्यार्थ्यांना बसणार असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.
दिव्यातील साउथ इंडियन शाळेला सरकारची मान्यता आहे. मात्र, दहावीच्या परीक्षेचे केंद्र या शाळेला दिलेले नाही. साउथ इंडियन व जयभारत इंग्लिश शाळेचे संचालक प्रा. शिवा अय्यर यांनी दोन्ही शाळांतून दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरले. मात्र, सेंटर देता येत नसल्याने बोर्डाने त्यांना परवानगी घेऊन या, असे सांगितले. त्यानुसार, त्यांनी अर्ज करताच त्यांना ८५ विद्यार्थ्यांसाठी परवानगी देण्यात आली. २५ फेब्रुवारी २०२० ला ही परवानगी त्यांनी बोर्डाकडे सादर केली. मात्र, नोव्हेंबर २०१९ ते २५ फेब्रुवारी २०२० या कालावधीची लेट फी बोर्डाने आकारली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामागे लेट फीपोटी आठ हजार १७० रुपये याप्रमाणे ८५ विद्यार्थ्यांची एकूण सहा लाख ९४ हजार रुपये भरण्याची नोटीस ‘जयभारत’ शाळेच्या मुख्याध्यापकांना बोर्डाने बजावली आहे. फी वेळेत न भरल्यास ८५ विद्यार्थ्यांसह ‘जयभारत’मधून दहावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल देता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.नियमांबाबत स्पष्टता नाहीजयभारत शाळेचे संचालक अय्यर याप्रकरणी म्हणाले, दोन शाळांतून विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्याची चूक मी केली आहे. विद्यार्थ्यांकडून इतक्या मोठ्या प्रमाणात लेट फी आकारणे योग्य नाही. शाळेच्या चुकीचा दंड शाळेस ठोठावला पाहिजे. विद्यार्थ्यांचे नुकसान नको. बोर्डाची परवानगी सादर करूनही लेट फी आकारली जाणे कितपत योग्य आहे. बोर्डाच्या अधिनियमात लेट फी आकारायची की दंड, याविषयी सुस्पष्टता दिसत नाही.