पंकज रोडेकर ठाणे : महाराष्ट्रापाठोपाठ ओडिशा येथेही पेट्रोल पंपांवर मापात पाप होत असल्याने, मध्यंतरी ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ओडिशातील ८६ पेट्रोल पंपांना नोटिसा बजावल्या होत्या. या प्रकरणाचा पसारा दिवसेंदिवस वाढल्याने, त्याचा तपास ओडिशा पोलीस दलाकडे देण्याबाबत ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी विचाराधीन होते, असे वृत्त ‘लोकमत’ने पहिल्यांदा दिले होते. ते वृत्त खरे ठरले असून, त्यानुसार,‘त्या’ ८६ पेट्रोल पंपांचा तपास ओडिशा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. यामुळे आता ठाणे शहर पोलिसांना महाराष्ट्रातील पेट्रोल पंप घोटाळ्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करता येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.पेट्रोल पंपांवरील डिझेल-पेट्रोल डिस्पेन्सिंग युनिटमधील पल्सर कार्ड, मदरबोर्ड, कंट्रोलकडे की, पॅड यामध्ये फेरफार करून ग्राहकांना कमी डिझेल-पेट्रोल वितरित होत असल्याचे कारवाईत निष्पन्न झाले होते. या प्रकरणी १७ जून २०१७ रोजी डोंबिवलीत कारवाई करून गुन्हा दाखल केल्यानंतर, राज्यभरात ठाणे गुन्हे शाखेचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांच्या पथकांनी छापे टाकले. याचदरम्यान, महाराष्टÑातील २१ जिल्ह्यांत, तर ओडिशा राज्यातील २ ठिकाणी इंडियन आॅइल ८७ पंप, हिंदुस्थान पेट्रोलियम ६९ पंप, भारत पेट्रोलियम १४, एस्सार पेट्रोलियम ८ पंप अशा एकूण १७८ पेट्रोल पंपांवर कारवाई केली आहे.>या प्रकरणाची व्याप्ती वाढू लागल्याने, त्या पेट्रोल पंपांचा तपास ओडिशा पोलिसांकडे सुपुर्द करण्याचा विचार सुरू झाला होता. त्यानुसार, तो तपास अखेर वर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाºयाने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
८६ पेट्रोल पंपांचा तपास ओडिशा पोलिसांकडे, आतापर्यंत एकूण १७८ पेट्रोल पंपांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 6:08 AM