कल्याण : नवीन रेल्वेमार्गांमध्ये बाधित होणारी झाडे तोडण्याचा प्रस्ताव केडीएमसी प्रशासनाने शुक्रवारच्या वृक्ष प्राधिकरणाच्या समितीच्या सभेत ठेवला होता. त्यानुसार, ८६९ झाडे तोडण्यास समितीने हिरवा कंदील दाखवला.कल्याण-टिटवाळा, दिवा-वसई, पनवेल-वसई या रेल्वेमार्गांवर अतिरिक्त नवीन रूळ टाकण्यात येणार आहेत. या कामामुळे मोठ्या प्रमाणावर झाडे बाधित होत आहेत. ही झाडे तोडण्यासाठी आणि पुनर्राेपण करण्यासाठी रेल्वेने केडीएमसीकडे परवानगी मागितली होती. त्यादृष्टीने प्रशासनाने शुक्रवारच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत प्रस्ताव सादर केले होते. एकूण बाधित ८६९ झाडांमध्ये २७ झाडांच्या फांद्या छाटण्यात येणार आहेत, तर उर्वरित झाडे तोडली जाणार आहेत. हे प्रस्ताव चर्चेला येताच त्याला एकमताने मान्यता देण्यात आली. कायदेशीर अडचणी तसेच कोणाची हरकत आहे का, असाही सवाल समितीचे अध्यक्ष वेलरासू यांनी उद्यान अधीक्षक संजय जाधव यांना केला. त्यावर रेल्वेच्या हद्दीतील झाडांबाबत एक हरकत नोंदवण्यात आल्याचे स्पष्टीकरण जाधव यांनी दिले. उद्यान विभागानेच ही हरकत निकाली काढावी, अशा सूचना वेलरासू यांनी केली. झाडे तोडल्यावर त्याबदल्यात रेल्वेकडून पुनर्राेपण होते की नाही, याचीही शहानिशा उद्यान विभागाने करावी, असेही वेलरासू यांनी सांगितले.झाडे तोडण्यासाठी एजन्सीपावसाळ्यात झाडांची छाटणी केली जाते, तसेच वाºयामुळे झाडे उन्मळून पडतात. या काळात धोकादायक झाडे तोडण्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणावर येतात. परवानगी दिल्यानंतर खाजगी व्यक्तींकडून झाडे तोडलीही जातात. परंतु, त्यांच्या फांद्या, पालापाचोळा तेथेच पडून असतो. तो पालिकेला उचलावा लागतो. त्यामुळे आता झाडे तोडण्यासाठी एजन्सी नेमण्याचा निर्णय केडीएमसीने घेतला आहे. झाडे तोडणे, त्याची विल्हेवाट लावणे, अशी सर्व कामे एजन्सीने करावी तसेच त्यांच्या कामगारांचा अपघात विमाही त्यांनीच काढावा आणि झाडे तोडताना मालमत्तेचे नुकसान झाले, तर त्याची जबाबदारीही त्यांच्यावरच असेल, असा निर्णय सदस्यांनी घेतला.झाडांवर विषप्रयोग झाल्याच्या आरोपांत तथ्य नाहीरेन ट्री या एकाच जातीच्या झाडांवर मिलीबगचा प्रादुर्भाव झाला आहे. परंतु, या झाडांवर विषप्रयोग झाल्याचा होत असलेला आरोप पाहता, असे असते तर अन्य झाडांवरही असा प्रयोग झाला असता, असे वेलरासू यांनी सांगितले. यासंदर्भात पुरावे असतील तर द्या, चौकशी करू, असेही ते म्हणाले.सदस्यांच्या शंकेवर स्पष्टीकरण देताना उद्यान अधीक्षक जाधव यांनीही जाणूनबुजून कोणी झाडे मारल्याच्या आरोपाचा इन्कार केला. एकाच जातीच्या झाडांना हा रोग लागला आहे. त्यामुळे ती सुकली आहेत. जर अन्य जातींची झाडेही सुकली असती तर शंकेला वाव होता, असेही ते या वेळी म्हणाले.
रेल्वेमार्गांसाठी ८६९ झाडांवर संक्रांत! वृक्ष प्राधिकरणाचा हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 5:29 AM