लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात गेल्या दोन वर्षांत १६९ तर वर्षभरात ८७ खून आणि २१९ लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे कोरोनामुळे लॉकडाऊन असूनही २०१९ च्या तुलनेत खुनाच्या घटना अधिक घडल्या आहेत.
आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळांतील ३५ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात २०२० मध्ये ८७ पैकी ८६ खुनाचे गुन्हे उघडकीस आले. लैंगिक अत्याचाराचे २१९ पैकी २१४ उघडकीस आले, तर ४५१ अल्पवयीन मुलींना लग्नाच्या आमिषाने पळवून नेले. २०१९ मध्ये ८२ पैकी ७५ उघड झाले. याच काळात ३२३ लैंगिक अत्याचारांपैकी ३०४ गुन्हे उघडकीस आले. तर ६२८ अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याच्या घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
* २०२०
खून - ८७
बलात्कार -२१९
फूस लावून पळविणे -४५१
२०१९
खून -८२
बलात्कार -३२३
फूस लावून पळविणे -६२८
* या घटनांनी हादरला होता ठाणे जिल्हा-
२०२० मध्ये उल्हासनगरचा चायनीजविक्रेता अंबरनाथ येथील नालंबी रोडवर त्याच्या मैत्रिणीबरोबर फिरायला गेला होता. त्या वेळी एका रिक्षाचालकाने झुडपात नेऊन लुटले. त्या वेळी विरोध करणाऱ्या तिच्या मित्राला त्याने गोळी झाडून ठार केले होते. त्याच्या मृत्यूनंतर ही तिथून पळून न जाता या नराधमाने त्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून पलायन केले होते. या खून आणि बलात्काराच्या घटनेत पोलिसांनी एका मोबाइलच्या आधारे उल्हासनगर येथून आरोपीला अटक केली होती.
* मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांचा मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी गोळीबार करून खून केला होता. जमीलच्या निकटवर्तीयांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नगरसेवकावर संशय व्यक्त केल्याने एकच खळबळ उडाली होती.
* तीन वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचाराची घटना ठाणे शहरात ऑक्टोबर २०२० मध्ये घडली होती. यात नौपाडा पोलिसांनी योगेश चव्हाण (३६) याला अटक केली होती.