भिवंडी : भिवंडी महापालिका प्रशासनाने भिवंडी शहरातील धोकादायक, अतिधोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार भिवंडी पालिका हद्दीत एकूण ८९४ इमारती धोकादायक आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षी धोकादायक इमारतींची संख्या १२४३ होती. यंदा त्यात घट झाली आहे. मात्र, धोकादायक इमारतींची संख्या कशी कमी झाली, किती इमारती दुरुस्त झाल्या, किती इमारती जमीनदोस्त केल्या, याबाबतची माहिती प्रशासन देऊ शकले नाही. त्यामुळे या संपूर्ण आकडेवारीवर शहरातून शंका उपस्थित होत आहे.
धोकादायक, अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून अतिधोकादायक व राहण्यास अयोग्य, तात्काळ निष्कासित करणाऱ्या इमारतींची संख्या ३४६ आहे. तर, इमारत रिकामी करून दुरुस्ती करण्याजोग्या अशा ३३२ इमारती आहेत. इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करण्यालायक १९१ व इमारतीची किरकोळ दुरुस्ती आवश्यक आहेत, अशा २५ इमारती आहेत. अशा एकूण ८९४ इमारतींचा समावेश असून, यातील प्रभाग समिती ३ मध्ये सर्वाधिक ३६१ इमारती धोकादायक आहेत.
यापूर्वी झाली जीवितहानी
भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेनंतर धोकादायक इमरतींचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाही त्याबाबत गांभीर्यपूर्वक कारवाई करताना पालिका प्रशासन दिसत नाही. त्यामुळेच मागील काही दिवसात दिवानशाह आजमीनगर येथे एक मजली घराची पडझड होऊन झालेल्या दोन दुर्घटनांमध्ये एक, तर आजादनगर येथे एका घराचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक, अशा दोन जणांनी जीव गमावला आहे.