ठाणे: भिवंडीतील धामनकरनाका येथील अल्ताफ अत्तरवाला या दुकानावर छापा टाकून हुक्का फ्लेवरचा माल गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटने जप्त केला होता. याच चौकशीतून गेल्या चार दिवसात या पथकाने नऊ कोटी ३६ लाख ७८ हजार ५२० रुपयांचा हुक्का फ्लेवरचा माल जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सोमवारी दिली.
धामनकरनाका येथील अल्ताफ अत्तरवाला या दुकानावर गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडीतील युनिट दोनच्या पथकाने छापा टाकून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले आठ हजार ९४० रुपयांचे ५७ प्रकारचा हुक्का फ्लेवर्सचा माल जप्त केला होता. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात ६ ऑक्टोंबर २०२१ रोजी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्हयाचा तपास अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे आणि उपायुक्त पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
त्याच अनुषंगाने मिळालेल्या माहितीच्या आधारे ८ ते ९ ऑक्टोबर रोजी दापोडा गाव परिसरातील हरीहर कॉम्प्लेक्स येथील कृष्णा कन्स्ट्रक्शन या इमारतीमधील गोदामात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव आणि उपनिरीक्षक शरद बरकडे आदींच्या पथकाने धाडसत्र राबविले. या धाडीत निकोटीनयुक्त अफजल हुक्का फ्लेवरचे आठ कोटी ४२ लाख ४९ हजार ६१० रुपयांचे २८६२ बॉक्स आणि सोएक्स हर्बल फ्लेवरचे ९४ लाख २८ हजार ९१० रुपयांचे ३७५ बॉक्स असा नऊ कोटी ३६ लाख ७८ हजार ५२० रुपयांचे हुक्का फ्लेवरचा माल जप्त केला.
अफजल आणि सोएक्स या दोन्ही हुक्का फ्लेवरचा माल मुंबईतील सोएक्स इंडीया या कंपनीकडून उत्पादन आणि निर्यात केला जात आहे. हा माल भिवंडीतील गोदामातून बेकायदेशिरपणे विक्र ी केला जात होता. सोएक्स इंडीया प्रा. लि. या कंपनीकडुन बनविलेला निकोटीनयुक्त अफजल हुक्का फ्लेवर हा माल भिवंडी, ठाणे आणि मुंबईसह महाराष्ट् इतर ठिकाणी मोठया प्रमाणात तस्करी होत असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाल्याची माहिती सूत्रंनी दिली.
‘‘हुक्क्याच्या सेवनामुळे तरुणांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतो. शिवाय, हीच मुले गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळल्याचे आढळले आहे. हुक्का फ्लेवरचा बेकायदेशीर साठा केलेल्या कंपनीविरुध्द पुढील कारवाई करण्यात येत आहे.- लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपायुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे शहर