लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : दीड वर्षाच्या कोविड काळात मुंबई आणि परिसरात लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवासीसंख्या घटलेली असतानाच आता प्लॅटफॉर्म तिकिटांच्या माध्यमातून होणाऱ्या उलाढालीत दीड वर्षांच्या कालावधीत ९ कोटी ५७ लाख ३४ हजार रुपयांची घट झाली आहे. या कालावधीत फलाटात नातेवाइकांना घ्यायला, सोडायला येणाऱ्या प्रवाशांची संख्या ९८ लाख ६३ हजार ४२५ ने कमी झाल्याचे मध्य रेल्वेने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. रेल्वे अभ्यासकांच्या मते ही ऐतिहासिक घट आहे.
गतवर्षीपासून ऐन मोसमात, म्हणजेच मार्च महिन्यात देशभरात रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. त्याचा फटका प्लॅटफॉर्म तिकीट सेवेलाही बसला असून, त्यामुळेच उलाढालीत मोठी तफावत स्पष्ट दिसून येत आहे.
--------------
मुंबई, एलटीटी स्थानकातून दररोज सुमारे ७० लांब पल्ल्याच्या विशेष गाड्या डाऊन मार्गावर सुटत आहेत, तेवढ्याच प्रमाणात अप मार्गावर येतदेखील आहेत.
--------------------
प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा कमी झाले, पण...
कोरोना काळात प्लॅटफॉर्म तिकीट वाढवले तरी लॉकडाऊन असल्याने गाड्या बंद होत्या. त्यामुळे रेल्वेच्या तिकीट विक्रीच्या उलाढालीवर परिणाम झाला. अर्थात रेल्वेला ते अपेक्षित होते. पण, प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देऊन आणि कोविड नियमावलींचे पालन व्हावे, यासाठी काही ठिकाणी प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत ५० रुपयांपर्यंत वाढवली होती. या निर्णयाला प्रवासी संघटना, सामान्य प्रवाशांचा वाढता विरोध बघून रेल्वेने बहुतांश विभागात ते पुन्हा कमी केले. मुंबईत आताच हे दर कमी झाले असून, आगामी काळात त्यामुळे उलाढाल वाढते की नाही, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
-------------- ---- - ---------
प्लॅटफॉर्म तिकिटांमधून उलाढाल
एप्रिल २०१९ ते मार्च २०२० - ९ कोटी ९३ लाख ६८ हजार ७०० रुपये
एप्रिल २०२० ते मार्च २०२१ - १ कोटी ५६ लाख ६ हजार ५९० रुपये
एप्रिल २०२१ ते मे २०२१ पर्यंत - ३६ लाख ३४ हजार १७० रुपये
--------------------
प्रवासी वाढले?
अनलॉकनंतरही लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या मर्यादित असल्याने व कोविडचे रेल्वे प्रवासासंदर्भात नियम असल्याने अजूनही नागरिक प्रवासाला जाणे टाळत आहेत. जून महिना सुरू झाल्याने ऑनलाइन शिक्षण सुरू झाले असून, त्यामुळेही पाल्य व्यस्त झालेत. तसेच आहेत त्या नोकऱ्या टिकवण्यासाठी अजून तरी नागरिक लांबचे प्रवास टाळत असल्याने लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये दोन वर्षांपूर्वीसारखी गर्दी दिसून येत नाही.
-----------
मध्य रेल्वेच्या ज्या स्थानकांत लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात, त्या स्थानकातच प्लॅटफॉर्म तिकिटांची उलाढाल सर्वसाधारणपणे जास्त असते. मात्र, कोविड काळात त्या गाड्यांची संख्या मर्यादित असल्याने, तसेच प्रवासीही घटल्याने प्लॅटफॉर्म तिकिटांच्या उलाढालीवर त्याचा परिणाम झाला असावा.
- पी. डी. पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे