उल्हासनगर : एका आठवड्यात ३० डेंग्यूच्या रुग्णांची नोंद आरोग्य विभागात नोंद झाली असून महापालिकेच्यावतीने फवारणीसह सर्वेक्षण सुरू केल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ दीपक पगारे यांनी दिली. तसेच तापाच्या रुग्णात वाढ झाल्याची माहिती पगारे यांनी दिली. उल्हासनगर महापालिकेचे स्वतःचे रुग्णलाय नसल्याने आरोग्य सुविधासाठी मध्यवर्ती रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते. भाजपाचे राजेश वधारीया यांनी शहरात डेंग्यू रुग्ण वाढल्या बाबत माहिती आरोग्य विभागाला दिल्यावर विभाग खडबडून जागा झाला.
कॅम्प नं-२ परिसरात दोन डेंग्यूचे रुग्ण मिळाले असून डेंग्यूच्या अळ्याही मिळून आल्या आहेत. याबाबत आरोग्य अधिकारी डॉ. दीपक पगारे यांच्यासी संपर्क साधला असता त्यांनी एका आठवड्यात डेंग्यूच्या ३० रुग्णांची नोंद झाल्याची माहिती दिली. तर पुन्हा संपर्क करून ९ डेंग्यूची नोंद असल्याचे सांगितले. महापालिका आरोग्य केंद्र, मध्यवर्ती व खासगी रुग्णालयाच्या माहितीनुसार ९ डेंग्यू रुग्णांची नोंद झाल्याची माहिती डॉ. पगारे यांनी देऊन उपाययोजना सुरू केल्याची माहिती दिली.
महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून अंटेलिया येथे २०० खाटाचे रुग्णालय उभारले असून गेल्या एका वर्षांपासून रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहेत. तर दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या कमी असताना आरोग्य केंद्र व कोविड रुग्णालय ओसाड पडले. मात्र तरीही महापालिका भाड्याच्या रुग्णालयावर दरमहा २४ लाखाचा खर्च करीत आहे. त्याप्रमाणात आरोग्य सुविधेची वानवा असल्याची टीका सर्वपक्षीय नेते करीत आहेत. डेंग्यूचे रुग्ण सापडले, त्यापरिसरात फवारणी सुरू करून घरोघरी सर्वेक्षण आरोग्य विभागाने सुरू केले. डेंग्यूच्या रुग्णासह तापाच्या रुग्णात वाढ झाली असून नागरिकांनी आरोग्य सांभाळण्याचा सल्ला महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी दिला. तसेच कोरोना काळात आलेल्या आरोग्य अधिकारी डॉ. पगारे यांच्या बदलीची मागणी सर्वस्तरातून होत आहे.