मीरा रोड : सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली असताना मीरा-भार्इंदर महापालिकेने शहरात ११ ई-टॉयलेटसाठी खर्च केलेले तब्बल ९० लाख रुपये फुकट गेल्यात जमा आहेत. कोणताही सारासार विचार न करता तसेच सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याने करदात्या नागरिकांचे पैसे वाया गेल्याने संताप व्यक्त होत आहे. या ई-टॉयलेटमधील साहित्याच्या चोºया सुरूच असून, बहुतांश टॉयलेट दारूचा अड्डा बनले आहेत.
मीरा-भार्इंदर महापालिकेची सार्वजनिक शौचालये दुर्गंधीने ग्रासली असून सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. सार्वजनिक शौचालयांच्या देखभालीकडे दुर्लक्ष करणाºया महापालिकेला केवळ ११ई-टॉयलेटसाठी तब्बल ९० लाखांचा खर्च करावासा वाटला. प्रणीत एंटरप्रायझेसला शहरात आय-टॉयलेट बसवण्याचे कंत्राट दिले. या ठेकेदाराने जेसलपार्क भागात ३, सृष्टी भागात २ तर शांती विद्यानगरी, हाटकेश, अयप्पा मंदिर, मीरा रोड रेल्वेस्थानक, शिवार उद्यान आदी भागात प्रत्येकी एक याप्रमाणे ११ई-टॉयलेट बसवली. विशेष म्हणजे ते फक्त भाजप नगरसेवकांच्या प्रभागातच बसवले आहेत.महागड्या पण अत्याधुनिक असलेल्या ई-टॉयलेटचा वापर करण्याकरिता पाच रुपयांचा शिक्का टाकावा लागतो. वापर कसा करायचा, याच्या सूचना आहेत. सीसीटीव्ही कॅमेºयापासून एलईडी लाइट आदी अत्याधुनिक उपकरणे आहेत. पाणी, दैनंदिन सफाई पालिकेने करायची आहे. या टॉयलेटमधील अस्वच्छता, तोडफोड आदी प्रकार एप्रिल महिन्यापासून पालिकेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही महापालिका व लोकप्रतिनिधींनी त्याकडे सतत दुर्लक्षच केले आहे. इतक्या महागड्या टॉयलेटच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याच उपाययोजना व खबरदारी घेतली नाही. त्यामुळे याटॉयलेटमधील स्वयंचलित दरवाजे, सीसीटीव्ही, एलईडी दिवे आदी यंत्र साहित्याची तोडफोड वा चोरीला गेल्याचे प्रकार सुरूच आहेत. बहुतांश ई-टॉयलेटचा वापर लोक करत नाहीत.जेसलपार्क येथील टॉयलेटच्या बाजूला लोक लघुशंका करतात. शिवार उद्यान येथील टॉयलेटमध्ये चक्क दारूच्या बाटल्या आढळून आल्या. येथील दिवे, सीसीटीव्ही आदींची तोडफोड करून चोरीला गेले आहेत. येथे अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे.ई-टॉयलेट ही आवश्यक बाब आहे. त्याच्या वापराबद्दल लोकांचे प्रबोधन केले पाहिजे. जेसलपार्क येथील ई-टॉयलेटच्या आजूबाजूला लोक लघुशंका करतात, हे खरं असलं तरी, त्यांचा वापरसुद्धा सुरू आहे.- रोहिदास पाटील(सभागृह नेते, तथा भाजपचे स्थानिक नेते)पालिकेच्या सार्वजनिक शौचालयांची पुरती दुरवस्था झालेली आहे. घाणीचे साम्राज्य पसरले आहे. महिलांचे तर खूपच हाल होत आहेत. पण त्याकडे लक्ष न देता ई-टॉयलेटच्या नावाखाली नागरिकांच्या पैशांचा चुराडा चालवला आहे. आधी लोकांना साधी, पण स्वच्छ-चांगली स्वच्छतागृहे तरी सार्वजनिक ठिकाणी पुरवावीत. - सॅन्ड्रा रॉड्रिक्स,माजी सभापतीई-टॉयलेटमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय असून अनावश्यक खर्च प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. यात गुंतलेल्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींवर कारवाई झाली पाहिजे. दुरवस्था झालेल्या आय-टॉयलेटप्रकरणी बेजबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे.- हेमंत सावंत, शहर संघटक, मनसे