मीरा रोड : मीरा-भाईंदर म्युकरमायकोसिसचे एकूण नऊ रुग्ण असून त्यातील दोन रुग्णांना घरी पाठवण्यात आले असून सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना होऊन गेल्यानंतर त्यांना या आजाराची लक्षणे दिसू लागली. नऊ रुग्णांपैकी मीरा-भाईंदरमधील पाच तर अन्य शहरातील चार रुग्ण आहेत.
कोरोनाची लागण झाल्यावर उपचारांसाठी जास्त प्रमाणात स्टेरॉईडचा वापर केला गेल्यास रोगप्रतिकारकशक्ती कमी असणाऱ्यांमध्ये म्युकरमायकोसिसचे दुष्परिणाम दिसू लागतात. मीरा-भाईंदरमधील दोन रुग्णालयात या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भाईंदरचे रामलोक तर मीरा रोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे रुग्ण दाखल आहेत.
महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकिशोर लहाने म्हणाले की, म्युकरमायकोसिसचे नऊ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी दोन जणांना उपचारांनंतर घरी पाठवण्यात आले. बहुतांश रुग्ण हे ५० वर्षांवरील आहेत.
कोरोना रुग्णांवर उपचार करताना रुग्णाची प्रकृती आणि अन्य आजार यांचा विचार करून स्टेरॉइडचा वापर केला पाहिजे. म्युकरमायकोसिसमुळे घाबरून जाण्याचे कारण नसले तरी नागरिकांनी त्रास जाणवत असल्यास तो घरीच अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांना दाखवले पाहिजे, असे डॉ. लहाने म्हणाले.
............
वाचली