कल्याण : कल्याणडोंबिवली शहरातील पाच दिवसांच्या गणपतींना सोमवारी रात्री उशिरापर्यंत भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषांनी विसर्जन स्थळे दणाणून गेली होती. पाच दिवसांच्या गणेशासोबत गौरीचेही विसर्जन करण्यात आले. गौरी-गणपतीला निरोप देताना भाविक भावूक झाले होते.अनेक ठिकाणी गणेश विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. ढोल-ताशा, बेंन्जो या वाद्यांच्या तालावर तरुणाई मिरवणुकीत थिरकत होती. विसर्जन घाटावर आरती करुन गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. दुपारी कल्याण डोंबिवलीत जोरदार पाऊस पडला. त्यामुळे विसर्जन सोहळ््यावर पावसाचे सावट होते. सायंकाळी पावसाने उघडीप घेतल्याने गणेश विसर्जनाच्या मिरवणुका उत्साहात निघाल्या. पाच दिवसांच्या ९ हजार ३६५ घरगुती गणेशमूर्तींचे तर २ हजार ७३० गौरींचे विविध घाटांवर विसर्जन करण्यात आले. कल्याण डोंबिवली महापालिकेने कृत्रिम गणेश विसर्जन तलाव तयार केले होते. गणेश भक्तांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे महापालिकेने सांगितले. गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे आवाहन आयुक्त गोविंद बोडके यांनी केले होते. नैसर्गिक तलाव, नदीपात्र आणि खाडी किनारे प्रदूषित होण्याचे प्रमाण कमी होण्यास त्यामुळे मदत झाली. महापालिकेने सीसीटीव्हीची व्यवस्था केली होती.खडवली नदीवर भक्तांची गर्दीटिटवाळा : टिटवाळा शहरासह ग्रामीण भागात रूंदे, गुरवली, मांडा, वासुंद्री व टिटवाळा येथे काळू नदीच्या घाटावर तसेच खडवली, भातसा व पाचवा मैल येथे उल्हासनदीच्या पात्रात गणपतींचे विसर्जन झाले.टाळ मृदगांचा गजर व हरिनामाच्या जयघोषात मिरवणूक काढत गणपती बाप्पाचे व गौराईचे विसर्जन करण्यात आले. टिटवाळा शहरासह ग्रामीण भागात घरगुती १३१५ व सार्वजनिक १५ गणपती बाप्पांचे व ८०७ गौराईना जड अंतकरणाने निरोप देण्यात आला. विसर्जन ठिकाणी टिटवाळा पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.पाहुणे म्हणून आलेल्या बाप्पाला आणि माहेरवाशिणींना निरोप देताना भाविक भावूक झाले होते. शहर आणि ग्रामीण भागातून मिरवणुका विसर्जनस्थळी येत होत्या.गणपती बाप्पा मोरया, पुढच्यावर्षी लवकर या म्हणत निरोप देण्यात आला. ढोलताशे, टाळमृंदगाचा गजर असे उत्साहाचे वातावरण होते. विसर्जनाच्या ठिकाणी पालिका, पोलिसांची चोख व्यवस्था होती. केडीएमसीतर्फे जीवरक्षकही तैनात करण्यात आले होते. येणाऱ्या भाविकांना यंत्रणांकडून आवश्यक त्या सूचना दिल्या जात होत्या.कल्याण पूर्वेत भाविकांचा उत्साहकोळसेवाडी : कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी, चिंचपाडा, तिसगाव येथील कृत्रिम तालवाच्या ठिकाणी भाविकांनी गणपती विसर्जनासाठी गर्दी केली होती. नांदिवली तलाव, लोकसेवा खदान मिळून पाच ठिकाणी विसर्जनाची सोय केली होती. २६२० मूर्ती व ४६५ गौरींचे विसर्जन झाले. विसर्जनाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. पोलिसांना सहकार्य करण्यासाठी विविध महाविद्यालयांमधील पोलीस मित्र तैनात केले होते. काही राजकीय, सामाजिक संस्थांतर्फे भाविकांसााठी पाण्याचे वाटप करण्यात आले. विसर्जनाच्याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
९ हजार ३६५ घरगुती गणपतींचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 3:29 AM