n लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दिवाळीनंतर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत असून दुसऱ्या लाटेची शक्यताही वर्तविली जात आहे. परंतु, त्यासाठी पालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली. रुग्ण वाढत असले तरी कोरोना हॉस्पिटलची सेवा बंद केली नसल्यामुळे शहरात आजही ९० टक्के बेड शिल्लक असल्याची माहितीही त्यांनी दिली. शहरातील विविध रुग्णालयांतील ३६६८ बेडपैकी ३०३५ बेड आजघडीला शिल्लक आहेत.
कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर मे, जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांत रुग्णांची संख्या वाढताना दिसली. परंतु, याच कालावधीत महापालिकेने साकेत येथे १३०० बेडचे कोविड सेंटर सुरू केले. तसेच कळवा आणि मुंब्रा, वागळे येथेही कोविड सेंटर सुरू केल्यामुळे खाजगी रुग्णालयांत रुग्णांना बेड न मिळण्याचा ताण हलका झाला. सुरुवातीला बेड मिळविण्यासाठी दोनदोन दिवस वेटिंगवर राहावे लागत होते. परंतु, आता हव्या असणाऱ्या रुग्णालयात उपचार मिळत आहेत. महापालिकेच्या कोविड सेंटरमुळे गोरगरीब रुग्णांवर योग्य उपचार झाले. मधल्या काळात रुग्णांची संख्या कमी झाल्याने सहा कोविड रुग्णालये बंद केली. त्यामुळे ४३३४ बेडपैकी आजघडीला ३६६८ बेड उपलब्ध आहेत. त्यातील ६३३ बेड फुल्ल असून हे प्रमाण अवघे १७ टक्के असून ३०३५ बेड शिल्लक आहेत. यामध्ये ऑक्सिजन नसलेले ८५४, ऑक्सिजनचे १९०३, आयसीयूचे २७८ आणि व्हेटिंलेटरचे १३७ बेड शिल्लक आहेत.महापालिका हद्दीत असलेल्या ३२ कोविड सेंटरमध्ये तब्बल ९० टक्के बेड आजमितीस शिल्लक आहेत. सध्या एक हजार ५८८ रुग्ण हे प्रत्यक्ष उपचार घेत असून, येत्या काही दिवसांत रूग्ण वाढले तरी चिंता नाही. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास पालिका सज्ज असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
दिवाळीनंतर रूग्ण वाढले दिवाळीनंतर आठ दिवसांत ठाण्यात तब्बल एक हजार ५११ नवे रुग्ण आढळले, तर एक हजार ६० रुग्ण कोरोनामुक्त झाले. असे असले तरी महापालिकेने काही रुग्णालये बंद केल्यानंतरही उपलब्ध रुग्णालयांमध्ये ९० टक्के बेड शिल्लक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले