- सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शुक्रवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आठ ग्रामपंचायतींचे सरपंच, तर ९० सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे आता केवळ सरपंच व सदस्यपदांसाठी १८८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या ग्रामपंचायतीत १९ सार्वत्रिक तर ७१ जागांवर पोटनिवडणुका आहेत. यात १०९ जागांवर उमेदवारी अर्जच आलेले नाहीत. याठिकाणी २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ४४३ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली. त्यातील १९ सरपंचांसाठी ८४ अर्ज आहेत. तर, सदस्यपदांसाठी ३५९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी सदस्यपदांचे ३४९ अर्ज वैध ठरले असून केवळ १० अवैध ठरवण्यात आले, तर ६५ सदस्य बिनविरोध विजयी झाले आहेत. आता केवळ १५४ उमेदवार सदस्यपदाच्या निवडणूक रिंगणात शिल्लक आहेत. तर, सरपंचपदांचा एकही अर्ज अवैध नसून ८४ वैध ठरले. मात्र, निवडणूक रिंगणात आता केवळ १३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ३४ उमेदवार नशीब आजमावत आहेत. उर्वरित सहा सरपंच बिनविरोध विजयी झाले आहेत.याप्रमाणेच जिल्ह्यातील ७१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका हाती घेतल्या आहेत. त्यात चार ग्रामपंचायतींच्या सरपंचांसह १६० सदस्यांसाठी ही पोटनिवडणूक आहे. मात्र, त्यातील शहापूरचे बाभळे ग्रा.पं. व कल्याणची वेहळे या दोन ग्रा.पं.चे दोन सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित शहापूरची लवले व नांदवळ या दोन ग्रा.पं.च्या सरपंच निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जच दाखल झालेले नाहीत. एवढेच नव्हे तर १६० सदस्यांच्या पोटनिवडणुकीपैकी २५ सदस्य बिनविरोध निवडून आले. तर, २६ सदस्य निवडणूक रिंगणात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे १०९ सदस्यपदांसाठी उमेदवारी अर्जच दाखल झाले नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.असे आहे चित्रआता प्रत्यक्षात मुरबाड तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींपैकी १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. यात चार, तर भिवंडीमधील एक ग्रामपंचायतही बिनविरोध निवडून आली आहे. याशिवाय, मुरबाडच्या १८ ग्रामपंचायतीत पोटनिवडणुकांसाठी मतदान होणार नाही. तर, भिवंडीच्या १९ पोटनिवडणुकांपैकी पाच ग्रामपंचायतींमध्ये, अंबरनाथमध्ये दोनपैकी एका ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक आहे. कल्याणच्या आठही ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका नाही. तर, शहापूरच्या २३ पैकी केवळ पाच पोटनिवडणुका होणार आहेत. जिल्हाभरात केवळ ११ ग्रामपंचायतींत पोटनिवडणुकांसाठी मतदान होणार आहे.- बिनविरोध सरपंचांच्या ग्रामपंचायती : भिवंडीतील गोवे ग्रामपंचायत. मुरबाडमधील जडई, सोनावळे, पेंढरी, संगम आणि सोनगाव. कल्याणमधील वेहळे, शहापूर तालुक्यातील बाभळे.
आठ सरपंचांसह ९० सदस्य बिनविरोध; १८८ जण निवडणूक रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 1:34 AM