लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. शहरांसह गांवखेड्यातही पाऊस पडला नाही. मात्र आतापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस उत्तमरीत्या बरसल्याने धरणांचा पाणी साठा वाढला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणात ९०.११ टक्के व बारवी धरणात ८९.९६ टक्के पाणी साठा तयार झाला आहे. यामुळे वर्षे भराची पाणी समस्या आता मिटली आहे. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत या दोन्ही धरणात काही अंशी पाणी साठा कमी झाला आहे.
जिल्ह्यातील सर्व महानगरांना व एमआयडीसीला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कमी पाणी साठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी ९०.२० टक्के साठा होता. पण यंदा हा साठा ८९.९६ टक्के आहे. बारवी धरणात अवघा १८६९ मिमी पाऊस पडला आहे. यापेक्षा या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जास्त पाऊस पडला आहे. यामध्ये खानिवरे या पाणलोटात आजपर्यंत २६२३ मिमी पाऊस पडला आहे. कान्होळला २००१मिमी, पाटगांवला १९२२मिमी आणि ठाकूरवाडी या पाणलोटात २२२७ मिमी. सरासरी पाऊस पडलेला आहे. यामुळे धरणांतील पाणी साठा ८९.९६ टक्के झाला आहे.
या बारवी धरणाची आजची पाणी पातळी १७.५४ मीटर नोंदली आहे. या धरणात आज रोजी ३३८.८४० पैकी ३०४.८१ दश लक्षघनमीटर पाणी साठा तयार झाला आहे. या धरणाप्रमाणे भातसा धरणातही गेल्या वर्षापेक्षा आज रोजी कमी साठा आहे. गेल्यावर्षी भातसात ९५.३७ टक्के साठा होता. यंदा तो ९०.१३ टक्के आहे.या भातसा व बारवी धरणाच्या तुलनेत आंध्रा धरणात गेल्या वर्षाच्या तुलनेत आजरोजी जास्त पाणी साठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी ६२.६६ टक्के असलेला पाणी साठा यंदा ६८.५६ टक्के तयार झाला आहे.