कल्याण : मालमत्ताकर थकवणाऱ्यांविरोधात कल्याण-डोंबिवली महापालिकेची कारवाई सुरूच असून आतापर्यंत ९० मालमत्तांवर जप्ती आणली आहे. यातील ८ मालमत्तांना सील ठोकले आहे. सर्वाधिक मालमत्ता ह प्रभागात जप्त केल्या असून इतर मालमत्ता सील करण्याची कारवाईदेखील याच प्रभागात केल्याची माहिती करनिर्धारक आणि संकलक विभागाने दिली. नगररचना विभागाला २३ मालमत्तांची बांधकामे थांबविण्याच्या सूचनादेखील केली आहे.जप्तीमध्ये अ प्रभागातील १५, ब मध्ये १८, क १४, ड ७, फ ९ आणि ह प्रभागातील २७ मालमत्तांचा समावेश आहे. प्रशासनाला मालमत्ताकराच्या वसुलीपोटी एकूण २३ कोटी ६ लाख येणे असून आतापर्यंतच्या कारवाईतून १ कोटी ५४ लाख ८६ हजार वसूल झाले. पाणी थकबाकीदारांविरुद्ध प्रशासनाची कारवाई सुरू असून सप्टेंबर २०१५ पासूनच्या कारवाईत थकबाकीदारांपैकी १६ जणांच्या नळजोडण्या खंडित केल्या आहेत. तर, प्रभागनिहाय बैठका घेऊन पथकाने आतापर्यंत २८८ अनधिकृत नळजोडण्या खंडित केल्या. मध्यंतरी थकबाकीपोटी मध्य रेल्वेचा पाणीपुरवठादेखील खंडित केला होता. यावर रेल्वे प्रशासनाने थकबाकीपोटी ८ कोटी ६८ लाख ८६ हजारांचा भरणा केला असून ७७ लाखांचा भरणा अजून बाकी आहे.
कर थकवणाऱ्या ९० मालमत्ता जप्त
By admin | Published: February 06, 2016 2:17 AM