लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणो : दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सहा जणांविरोधात एकही अर्ज आला नाही. त्यामुळे ते बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे निवडणूक रिंगणात ९१ उमेदवार आहेत. यातून २२ मार्चपर्यंत किती जण उमेदवारी मागे घेतात, याकडे आता या निवडणूक रिंगणातील या दिग्गज उमेदवारांचे लक्ष लागून आहे.
या टीडीसीसी बँकेच्या २१ संचालकांसाठी ही निवडणूक असून, ३० मार्चला मतदान होईल. यासाठी १०५ जणांनी त्यांचे २०६ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी छाननीमध्ये तब्बल आठ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. उमेदवारी अर्ज बाद झालेल्यांमध्ये विद्यमान संचालकांपैकी शहापूरच्या अस्नोली येथील सुनीता दिनकर यांचाही समावेश आहे. छाननीनंतर शिल्लक राहिलेल्यांपैकी आतापर्यंत एकाने उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. त्यानंतर आता ९७ उमेदवार शिल्लक आहेत. यातील सहा जण बिनविरोध निवडून आलेले आहेत. यामुळे फक्त ९१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
..............