ठाणो : शेतकऱ्यांची बँक म्हणून सुपरिचित असलेल्या दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेच्या १५ संचालकांसाठी मंगळवारी मतदानप्रक्रिया पार पडली. यासाठी नशीब अजमावणाऱ्या ४६ उमेदवारांना तीन हजार ६२पैकी दोन हजार ७९१ (९१ टक्के) मतदारांनी मंगळवारी मतदान केले. ३१ मार्च रोजी ही मतमोजणी येथील एम. एच. हायस्कूलमध्ये पार पडणार आहे.
सुमारे साडेदहा हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या टीडीसीसी बँकेच्या २१ संचालकांसाठी ही निवडणूक पार पडली. यापैकी सहा संचालक निवडून आले. उर्वरित १५ संचालकांसाठी मंगळवारी मतदान झाले. या निवडणुकीसाठी सहकार पॅनलसह महाविकास परिवर्तन पॅनेलचे प्रत्येकी १५ संचालकांसह अपक्ष १६ उमेदवारांसाठी जिल्ह्यातील १८ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. या मतदानासाठी मतपत्रिकेचा वापर करण्यात आला. मतमोजणी बुधवारी सोडतीत ते चार वाजेपर्यंत पूर्ण होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दिगंबर हौसारे यांनी लोकमतला सांगितले.
बहुजन विकास आघाडी व भाजप पुरस्कृत सहकार पॅनलच्या शिट्टी चिन्हासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या महाविकास परिवर्तन पॅनलचे कपबशी चिन्हावर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सायंकाळी ४ वाजेपर्यंतच्या चार फेऱ्यांमध्ये ९१ टक्के मतदान झाले. ठाणे व पालघर जिल्ह्यातील १८ मतदान केंद्रांवर मतदान शांततेत पार पडल्याचा दावा हौसारे यांनी केला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधील प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघासह पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्था, नागरी पंतसंस्था, नागरी बँकांतर्फे मच्छीमार संस्था, जंगल कामगार, दुग्ध व्यवसाय संस्थांचा मतदारसंघ, खरेदी-विक्रीचा मतदारसंघ, महिला राखीव, एस.सी. व एस.टी. मतदारसंघ, इतर मागासवर्गीय आणि विमुक्त, भटक्या जमाती सदस्यांचा मतदारसंघ आदींच्या ४६ उमेदवारांना मतदान झाले आहे.