लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: घरकाम करणाऱ्या लोकांना सरदारजी पैसे आणि धान्य वाटप करीत आहेत, अशी बतावणी करुन दोन भामटयांनी कळवा येथील एका ६५ वर्षीय महिलेचे ९२ हजारांचे सोन्याचे दागिने लुबाडल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात मंगळवारी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.कळव्यातील शिवाजीनगर येथे राहणारी ही महिला १९ एप्रिल रोजी सकाळी ११.३० ते १२ वाजण्याच्या सुमारास मनिषानगर गेट क्रमांक दोन येथील दत्त मंदिराजवळून पायी जात होती. त्याचवेळी दोघे अनोळखी भामटे तिच्याजवळ आले. त्यांनी ‘घरकाम करणाºया लोकांना सरदारजी पैसे आणि धान्य वाटप करीत आहेत, तुम्ही आमच्यासोबत चला, आम्ही तुम्हाला धान्य मिळवून देतो,’ अशी बतावणी केली. त्यानंतर त्यांनी तिच्याकडील सोन्याचे दागिने एका बॅगेमध्ये ठेवण्यास सांगितले. ‘तुमच्या अंगावर दागिने दिसले तर सरदारजी तुम्हाला पैसे आणि धान्य देणार नाही,’ अशीही त्यांनी बतावणी केली. त्यानंतर दागिने बॅगेमध्ये ठेवत असल्याचे भासवून त्यांनी या महिलेकडील ३० हजारांच्या १० ग्रॅम सोन्याच्या कान पट्टया, ३० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि ३२ हजारांचे दुसरे मंगळसूत्र असे ९२ हजारांचे दागिने हातचलाखीने लुबाडून तिची फसवणूक केली. याप्रकरणी २० एप्रिल रोजी या महिलेने कळवा पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सागर गोंटे हे अधिक तपास करीत आहेत.
धान्य मिळवून देण्याच्या नावाखाली ९२ हजारांचे दागिने लुबाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 9:56 PM
घरकाम करणाऱ्या लोकांना सरदारजी पैसे आणि धान्य वाटप करीत आहेत, अशी बतावणी करुन दोन भामटयांनी कळवा येथील एका ६५ वर्षीय महिलेचे ९२ हजारांचे सोन्याचे दागिने लुबाडल्याची घटना सोमवारी घडली.
ठळक मुद्देकळव्यातील घटनाफसवणूकीनंतर दोघे भामटे पसार