ठाणे : भटक्या श्वानाच्या हल्यात वाघ बकरी चहा चे मालक पराग देसाई यांचा मृत्यु झाला आहे. ठाण्यातही मागील काही महिन्यात भटक्या श्वानांची दहशत वाढल्याचे दिसत आहे. मागील आठवड्यातही कळव्यात भटक्या कुत्र्याने चार ते पाच जणांचे लचके तोडल्याची घटना समोर आली होती. तर ठाणे महापालिका हद्दीत मागील अवघ्या साडेचार महिन्यात तब्बल ९३३ घटना श्वान दंशाच्या घडल्याची माहिती पुढे आली आहे.
भटक्या श्वानांची दहशत आजही ठाणे महापालिका हद्दीत कायम असल्याचे चित्र आहे. भटक्या श्वानाकडून रस्त्यावरून चालताना, किंवा मोटारसायकल वरून जात असताना अंगावर येणे, गाड्यांच्या मागे धावणे, घोळक्याने अंगावर येणे, असे प्रकार खास करून रात्री होतात. यामुळे ठाणेकरांनी धास्ती घेतली असल्याचे चित्र आहे. भटक्या श्वानांने चावा घेतल्यास ते खाजगी रुग्णालयात उपचार घेतात. त्यामुळे त्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी होत नाही. जे रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेतात. त्यांची नोंद पालिकेच्या दप्तरी होत असते. महापालिकेच्या दप्तरी ही नोंद केवळ ४ ते ५ र्पयतच कधी कधी असते. परंतु वास्तविक हा आकडा मोठ्याप्रमाणात असल्याची माहिती भटक्या श्वानांवर अभ्यास करणारे दक्ष नागरीक सत्यजीत शहा यांनी दिली आहे. ठाणे पालिकेच्या हद्दीत जवळपास दिड लाखाच्या आसपास भटके श्वान आहेत, ते दिवसाला साधारण शंभर ते दीडशे जणांना चावा घेतात असा दावाही शहा यांनी केला आहे.
ठाणे महापालिकेकडून श्वान निर्बिजीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली असली तरी देखील शहरात श्वानांची संख्या वाढतांना दिसत आहे. मधल्या काळात ही मोहीम बंद होती. त्यानंतर आता पुन्हा नव्याने सुरु झाली आहे. परंतु भटक्या कुत्र्यांचा त्रास ठाणेकर नागरीकांना सहन करावा लागत आहे. मागील आठवड्यातही कळव्यात एकाच दिवशी भटक्या कुत्र्याने चार ते पाच जणांचे लचके तोडल्याची घटना घडली होती.
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मागील साडे चार महिन्यात ९३३ श्वान दंश केलेले रुग्ण उपचारासाठी आले आहेत. या जून मध्ये -२०१,जुलै -१६४,ऑगस्ट -१८४,सप्टेंबर -२१६,आणि ऑकटोबरच्या २० तारखेपर्यत- १६८ रुग्णांनी कळवा रुग्णालयात श्वान दंशावर उपचार घेतल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.