लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. अगदी चांगल्या पगाराच्या अधिकाऱ्यांनाही नोकऱ्या गमवाव्या लागल्या. साहजिकच, यातून आलेले नैराश्य आणि आर्थिक अडचणींमुळे अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. प्रत्येकाची कारणे वेगळी असली तरी, कोरोना काळात ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात तब्बल ९४३ जणांनी आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनासारख्या साथीच्या आजारावर मात करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांसह लॉकडाऊनही करावे लागले. परंतु, याच लॉकडाऊनमुळे अनेकांना मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळातील ३५ पोलीस ठाण्यांतर्गत २०१९ मध्ये ६७० आत्महत्यांची नोंद झाली. तसेच २०२० मध्ये लावलेल्या लॉकडाऊनच्या काळात हीच संख्या ६९५ च्या घरात गेली, तर जानेवारी ते एप्रिल २०२१ या चार महिन्यांच्या काळात २४८ जणांनी आपली जीवनयात्रा संपवली. पती-पत्नीचे भांडण, आर्थिक समस्या, कर्जबाजारी होणे, चारित्र्याचा आरोप होणे, तसेच प्रेमप्रकरणात अपयश... अशी अनेक कारणे यामध्ये असल्याचे पोलीस अधिकारी सांगतात.
* कोणत्या वयाचे किती...
आत्महत्या करणाऱ्यांची वयपरत्वे कारणे वेगळी आहेत. यात २० ते २५ वयोगटात अत्यल्प प्रमाण असून २६ ते ४० आणि ४१ ते ६० यामध्ये हे प्रमाण अधिक आहे. ६१ पेक्षा जास्त वयोगटात हे प्रमाण कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
* हे दिवसही जातील...
प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणींचा काळ येत असतो. नंतर आनंदाचे क्षणही येत असतात. हा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. कोरोना काळात पती-पत्नीमधील भांडणे वाढली. लॉकडाऊनमुळे प्रत्येकाचा स्पेस कमी झाला. परंतु, प्रत्येकाने एकमेकांच्या गरजांचा, भावनांचा आणि मनाचाही आदर केला पाहिजे. कोरोनाची पहिली आणि दुसरीही लाट संपली. तशीच आलेली वेळ जाणार आहे. सकारात्मकता ठेवली पाहिले. पुढे चांगले होईल, ही आशा ठेवली पाहिजे. तरच आत्महत्येचा विचार नक्कीच येणार नाही.
- डॉ. विक्रम वैद्य, मानसोपचार तज्ज्ञ,
प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे
.............................
कुटुंबाने काळजी घेण्याची गरज -
कोरोनामुळे मानसिक आजारांमध्येही वाढ झाली आहे. सौम्य ते अगदी मनोरुग्ण होण्यापर्यंतच्या प्रकारांमध्ये वाढ झाल्याचे आढळले आहे. नोकरी नाही, पैसे नाहीत, कर्ज होणे यातून स्वभावात बदल होतात. झोप उडते, चिंता, भीती वाटणे अशी लक्षणे आढळल्यास कुटुंबीयांनीही आधी संबंधिताला धीर देणे आवश्यक आहे. मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. सकारात्मक विचार रुजविल्यास आत्महत्येचा विचार येणार नाही.
- डॉ. संदीप दिवेकर, मानसोपचार तज्ज्ञ,
प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे
.........................
२०१९ मध्ये झालेल्या आत्महत्या - ६७०
२०२० मध्ये झालेल्या आत्महत्या - ६९५
जानेवारी २०२१ ते एप्रिल २०२१ या काळात झालेल्या आत्महत्या - २४८
..............................