लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोना महामारीत घरातील कर्ता व कुटुंब प्रमुख दगावल्यामुळे जिल्ह्यातील ९४५ महिला विधवा झाल्या आहेत. त्यांची उदरनिर्वाहाची समस्या सोडवण्यासाठी दरमहा एक हजार रुपये दिले जात आहेत. या विधवांपैकी ७२ जणींना आतापर्यंत एक हजार रुपयांचा लाभ मिळत आहेत. उर्वरित ८७३ महिलांची कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू असल्याने त्या अद्याप या लाभापासून वंचित आहेत.
कोरोना महामारीत आतापर्यंत जिल्ह्यातील ११ हजार २३७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये घरातील कमावते व कुटुंब प्रमुख असलेले ९४५ जण दगावले आहेत. त्यांच्या विधवा पत्नीला आता उदरनिर्वाहाची समस्या भेडसावत आहे. यावर केंद्र व राज्य शासनाने लक्ष केंद्रीत करून आणि जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेऊन या महिलांना तत्काळ संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी नियोजन केले. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सर्व तालुक्यांतील तहसीलदारांना फर्मान काढून या महिलांना या योजनेचे दरमहा एक हजार रुपये तत्काळ लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आतापर्यंत ७२ महिलांना या योजनेचा लाभ झाला असून त्यांच्या बँक खात्यात दरमहा एक हजार रुपये जमा होत आहेत.
कोरोनाच्या महामारीत आई-बाबा दगावलेली बालके, पतीचे निधन झाल्याने विधवा झालेल्या महिला आदींना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील कृती दल व टास्क फोर्सचे सभासद जिल्ह्यात सक्रिय झाले आहेत. त्यांच्याकडून या उपेक्षितांचा शोध घेऊन त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करून संबंधित तहसीलदारांना या महिलांची व्यथा लक्षात आणून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला जात आहे. असे ठाणे जिल्हा बालसंरक्षण अधिकारी तथा जिल्हा कृती दल समन्वयक रामकृष्ण रेड्डी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
--------पूरक जोड आहे...