ठाणे : शिक्षणाचा हक्क म्हणजे आरटीई या कायद्याखाली इंग्रजी माध्यमासह उत्तम दर्जाचे सर्वभाषिक शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये २५ टक्के शालेय प्रवेश गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील बालकांसाठी राखीव ठेवले आहेत. त्यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे आतापर्यंत नऊ हजार ५६४ प्रवेश पालकांनी दाखल केले आहेत.
जिल्ह्यातील या शालेय प्रवेशासाठी अद्याप सहा हजार ५७७ शालेय प्रवेश अर्ज पूर्ण करणे अपेक्षित आहे. यास अनुसरून संबंधित पालकांनी त्यांच्या बालकांचे अर्ज २१ मार्चपूर्वी दाखल करणे आवश्यक आहे. या शालेय प्रवेशासाठी पात्र असणाऱ्या एससी, एसटी, वंचित गट, ओबीसी, एसबीआय, दुर्बल गट, एक लाखापेक्षा कमी उत्पन्न, दिव्यांग ४० टक्के अपंगत्व आदींच्या पालकांनी त्यांच्या बालकांचे अर्ज दिलेल्या मुदतीत दाखल करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या शैक्षणिक वर्षाच्या या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत सर्व पंचायत समित्या व महापालिका क्षेत्रात जिल्ह्यात ६७७ शाळांमध्ये इयत्ता पहिलीसाठी ११ हजार ११४ व पूर्व प्राथमिकसाठी ९६० रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.