जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबर महापालिकांनीही कोविड सेंटर आणि रुग्णालयांच्या मार्फतीने केलेल्या उपचारांना आता मोठे यश येत आहे. जिल्हयात रुग्ण बरे होण्याची संख्या झपाटयाने वाढत आहे. त्यामुळे सध्या जिल्हाभर अवघ्या तीन हजार ९८३ रुग्णांवर उपचार सुरु असून तब्बल नऊ हजार ७९७ बेड रिकामेच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे महापालिकेने चेस द व्हायरस तसेच मिशन झिरो अंतर्गत घरोघरी आरोग्य सेविकांच्या मदतीने सर्व्हेक्षण आणि तपासणी मोहीम राबविली. त्याचबरोबर मीरा भार्इंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या चार महापालिकांसह कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ नगरपरिषदांच्या क्षेत्रातही ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ अंतर्गत मोठया प्रमाणात जेष्ठ रुग्णांची तपासणी, सर्व्हेक्षण आणि कोविड निदान करण्यात आले. वेळेत निदान आणि उपचार करणे सोपे गेल्यामुळेच जिल्हाभर रुग्णांची संख्या आता झपाटयाने कमी होत आहे.सध्या ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये चार हजार ४३४ बेडची संख्या असूनही दोन हजार ५०९ रिकामे बेड आहेत. उल्हासनगरमध्ये १२५० एकूण बेड असून ८०० बेड रिकामे आहेत. मीरा भार्इंदरमध्ये २७६ रुग्णांवर उपचार सुरु असून १२३९ बेड रिकामे आहेत. तर कल्याण डोंबिवलीमध्ये ९२९ रुग्णांवर उपचार सुरु असून तीन हजार ४३४ बेड रिकामे आहेत. भिवंडीत सध्या २३ रुग्णांवर उपचार सुरु असून रिकाम्या बेडची संख्याही मोठी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘‘ जिल्हयातील आरोग्य यंत्रणा तसेच महापालिका प्रशासनाने आरोग्य यंत्रणेतील सुविधा वाढवून कोरोना रुग्णांना वेळेत उपचार दिले. मास्क लावणे, सोशल डिस्टन्स, आणि स्वच्छता या त्रिसुत्रीची जनजागृती केली. कमी होणारी रुग्णसंख्या ही समाधानाची बाब आहे. परंतू, आगामी दिवाळी सण तसेच आता सुरु झालेले रेस्टॉरन्ट, सिनेमागृह, नाटयगृह आणि मॉल या सर्वच ठिकाणी नागरिकांनी काळजी घेणे महत्वाचे आहे. तरच कोरोनावर पूर्णपणे मात करता येईल.’’राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे.