ठाणे : ‘ज्ञान दिल्याने वाढते’ या उक्तीनुसार ठाण्यातील यशस्वी नगर येथे राहणारी स्वप्नाली कोलगे हिने बारावी परिक्षेत सुवर्ण यश मिळवले आहे. स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची शिकवणी घेत तिने स्वत:चा अभ्यास केला आणि बारावी परीक्षेत ८९.२३ टक्के मिळवले.स्वप्नाली ही जोशी - बेडेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. ती कला शाखेतून शिक्षण घेत होती. लहान असताना तिची आई आणि त्यानंतर लष्करी अधिकारी पदावरुन निवृत्त झालेले तिचे वडिल या दोघांचेही आजारपणाने निधन झाले. त्यानंतर तिच्या पालनपोषणाची जबाबदारी तिच्या मामाने घेतली. दहावी झाल्यानंतर अर्थार्जनासाठी तिने शिकवणी घ्यायला सुरूवात केली. इयत्ता दहावीत तिने ९३ टक्के गुण पटकावले होते. त्यानंतर कला शाखेत प्रवेश घेतला, तिच्या या निर्णयाला मामाने पाठिंबा दिला होता. शिकवणी आणि परीक्षेचा अभ्यास या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ घालणे माझ्यासाठी कठीण होते, असे स्वप्नालीने ‘लोकमत’ला सांगितले. सकाळी ८ ते १० शिकवणी, दुपारी १.१५ चे कॉलेज आणि तिथून आल्यावर सायं. ६ ते १० यावेळेत शिकवणी अशी तिची दिनचर्या होती. परीक्षेच्या काळात शिकवणी घेण्यासाठी तिने मामाची मदत घेतली. बारावीच्या वर्षात तिने स्व-अभ्यासावर भर दिला. दिवसातून ती चार तास अभ्यास करीत असे. अर्थशास्त्र या विषयात ती कला शाखेतून पदवी घेणार आहे आणि स्पर्धा परीक्षाही देणार आहे. आयएएस होऊन वडिलांचे स्वप्न तिला पूर्ण करायचे आहे. निकालाबाबत स्वप्नाली म्हणाली की, बारावीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळतील अशी अपेक्षा होती. या निकालाबबात मी फार खुश नाही पण घरातले सर्व खूश आहेत.
दिवंगत निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या लेकीने मिळविले ८९.२३ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 6:22 AM