ठाणे : २०५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यामुळे अडचणीत सापडलेल्या ठाण्यातील सीकेपी को-आॅपरेटिव्ह बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी बँकेच्या ठेवीदारांनी एकजूट केली आहे. ठेवीच्या रकमांमधील २१ कोटी रुपये भागभांडवलात वळते करण्यासाठी तब्बल ९९० ठेवीदारांनी पुढाकार घेतला आहे.जवळपास १०० वर्षे जुन्या सीकेपी बँकेकडे ५२० कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. या ठेवींमधून केलेल्या कर्जवाटपापैकी जवळपास २०५ कोटी रुपयांचे कर्ज वसूल झालेले नाही. या कर्जबुडव्यांची १४० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आर्थिक घोटाळ्यांमुळे बँकेच्या ठेवी ४८ टक्क्यांनी कमी झाल्या. बँकेसाठी ही एक प्रकारची धोक्याची घंटा आहे. बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी सीकेपी बँक डिपॉझिटर्स फोरमने पुढाकार घेत २५० कोटी रुपये उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेच्या विक्रीतून ८० कोटी रुपये, बँकेची स्वत:ची मालमत्ता विकून १० कोटी रुपये, ठेवीच्या रकमा भागभांडवलात वळत्या करून, १५० कोटी रुपये आणि १० कोटी रुपयांचे नवीन भागभांडवल उभारून, २५० कोटी रुपयांची तूट भरून काढण्याचे प्रयत्न बँकेच्या हितचिंतकांकडून सुरू आहेत. यासाठी डिपॉझिटर्स फोरमने अलीकडेच घेतलेल्या बैठकीमध्ये संचालक राजेंद्र फणसे यांनी बँकेची परिस्थिती सर्वांसमोर मांडली. नागरी सहकारी बँकांचे भागधारकच बँकेचे मालक असतात. त्यामुळे सरकारकडून या बँकांना कोणतीही मदत केली जात नाही.परिणामी, बँकेचे संचालक मंडळ, कर्मचारी व ठेवीदारांनी एकत्र येऊन बँकेला नवसंजीवनी देण्याचे आवाहन राजेंद्र फणसे यांनी केले.
सीकेपी बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी ९९० ठेवीदारांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 5:39 AM