ठाणे : शहरातील धोकादायक इमारतींच्या जाहीर झालेल्या यादीपैकी पहिली यादी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच मतदारसंघातील कोपरी प्रभाग समितीची आहे. या समितीअंतर्गत तब्बल ९९ धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा महापालिकेने बजावल्या आहेत. त्यामुळे आता नवीन निवारा शोधायचा कुठे, या विवंचनेत येथील नागरिक सापडले आहेत. कोपरी भागात अनेक जुन्या इमारती आहेत. सीआरझेड झोन असल्याने तेथे नव्या बांधकामांना परवानगी मिळत नाही, तसेच इमारतींच्या दुरुस्तीसाठीची परवानगी मिळण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत येथील रहिवाशी मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये अनेक वर्षांपासून राहत आहेत. कोपरीच्या सहायक आयुक्तांनी ९९ धोकादायक इमारतींना नोटिसा बजावून लवकरात लवकर स्ट्रक्चरल आॅडिट करून घेण्यास सांगितले आहे. तेथील रहिवाशांनी दुरुस्ती केल्यानंतर स्टेबिलिटी सर्टिफिकेट सादर केल्यास, धोकादायक इमारतींच्या यादीतून त्यांच्या इमारतीचे नाव वगळण्यात येणार आहे. दरम्यान, या संदर्भात स्थानिक नगरसेवक गिरीश राजे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, कोपरी भागात विशेष करून गावांमध्ये अनेक जुनी घरे आहेत, त्यांना दुरुस्तीची परवानगी देण्यात यावी. स्ट्रक्चरल आॅडिट करणे सर्वांनाच परवडणारे नाही. धोकादायक इमारती रिकामी करण्यापूर्वी महापालिकेने रहिवाशांना पर्यायी जागा द्यावी अथवा जुन्या जागांच्या बांधकामांना मंजुरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. मागील वर्षी आॅगस्टमध्ये ठाणे स्टेशन परिसरातील कृष्ण निवास ही इमारत पडून १२ जणांचा बळी गेला होता. त्या नंतर महापालिकेने धोकादायक व अतिधोकादायक इमारतींसाठी मार्गदर्शक तत्त्वे आखली. त्यात इमारती तोडणे, पुनर्बांधणी, मालक व भोगवटादार यांचे अधिकार संरक्षित करणे आदींचा समावेश आहे, तसेच ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान असलेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करणेदेखील बंधनकारक केले आहे. त्यानुसार या कामाला आता सुरुवात झाली असून, पहिली यादी कोपरी प्रभाग समितीची तयार केली आहे. विशेष म्हणजे, हा भाग पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात येत असल्याने ते या संदर्भात काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
९९ इमारतींना नोटिसा
By admin | Published: January 20, 2016 2:41 AM