मीरारोड - घोडबंदर किल्ल्यावर रविवारच्या शिवजयंती दिनी तब्बल १०५ फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर भगवा ध्वज फडकवण्यात आला. हा ध्वज या पुढे दिवसरात्र किल्ल्यावर फडकणार आहे. ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याचे पुरातत्व विभागाच्या निर्देशानुसार पुनर्निर्माण सुरु आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांनी घोडबंदर किल्ल्याच्या जतन, संवर्धन व डागडुजीसाठी आतापर्यंत १३ कोटी खर्च झाला आहे. किल्ल्याच्या बुरुजावर भगवा ध्वज कायमस्वरूपी असावा यासाठी आ. सरनाईक यांनी पाठपुरावा चालवला होता. त्यासाठी आमदार निधीतून ५० लाखांचा निधी सरनाईक यांनी दिला होता. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते सदर ध्वस्तंभाचे भूमिपूजन करण्यात आले होते.
१९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मुहूर्तावर भव्य ध्वज प्रतिष्ठापना सोहळा शिवभक्त, स्थानिक ग्रामस्थ व नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. बुरुजावर १०५ फूट उंच ध्वजस्तंभ आहे. तर भगवा ध्वज २० फूट उंच व ३० फूट लांब ध्वज आहे. हा ध्वज २४ तास फडकत राहील. ध्वज रात्रीही दिसावा यासाठी विद्युत व्यवस्था ध्वजाच्या दिशेने करण्यात आली आहे. रिमोटच्या साहाय्याने १०५ फूट उंच ध्वज स्तंभावरून हा ध्वज सरनाईक, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलिस आयुक्त मधुकर पांडेय, आयुक्त दिलिप ढोले यांच्या हस्ते रिमोटचे बटन दाबून फडकवण्यात आला. ११ पुरोहितांनी विधिवत ध्वजाचे पूजन केले. ध्वज स्तंभावर कायम फडकणारा ध्वज दर १ महिन्याने बदलला जाईल. एकूण ७ मोठे ध्वज उपलब्ध करून ठेवले आहेत.
सकाळी घोडबंदर गावातील श्री दत्त मंदिरापासून ढोलताशाच्या गजरात, तुतारीच्या निनादात 'ध्वज पूजन यात्रा' निघाली. झांज पथक, लेझीम पथक, ढोलताशांचा गजर आणि तुतारीच्या निनादात महिलांनी डोक्यावर मंगल कलश घेऊन 'कलश यात्रा' काढली. सकाळी गावातील तरुणांची बाईक रॅली निघाली. भगवे फेटे आणि टोप्यांनी वातावरण भगवे झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेले तरुण, मावळे घोड्यावर स्वार होऊन आले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर सह शांताराम ठाकूर , महेश शिंदे आदी उपस्थित होते.
हा भगवा ध्वज सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची नेहमीच आठवण करून देत राहील व त्यातून प्रत्येकाला प्रेरणा मिळत राहील. घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून मोकळ्या जागेत गार्डनिंग, किल्ल्यातील हौदात म्यूजिकल फाउंटन , लाईट अँड साउंड शो अशी बरीच कामे अजून होणार असून त्या सुशोभीकरणाचे लोकार्पण तसेच शिवसृष्टीचे भूमिपूजन १ मे रोजी मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येईल, अशी माहिती आ. सरनाईक यांनी दिली.