ठाणे : कोलशेत विसर्जन घाट येथील खाडीत एक २५ वर्षीय तरुणाने कारसह खाडीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याठिकाणी हजर असलेल्या एका स्थानिक नागरिकाने तत्काळ खाडीत उडी मारून यश बिसवास याला बाहेर काढले. तर घटनेची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली.
मंगळवारी सांयकाळी ४.५३ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार गणपती विसर्जन घाट जवळ, कोलशेत, ठाणे या ठिकाणी खाडीच्या पाण्यात यश बिसवास ( २५ ) रा. - हायलँड हॅवन टॉवर, बाळकुम, या व्यक्तीने कारसह खाडीत उडी मारली. दरम्यान तेथे उपस्थित असणाऱ्या मनदीप शिल्पकार रा. कोलशेत या व्यक्तीने पोहत जाऊन यश बिसवास याला खाडीतून सुखरूप बाहेर काढले. घटनास्थळी कापूरबावडी पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०२- पिकअप वाहनासह, अग्निशमन दलाचे जवान ०१ - इमर्जन्सी टेंडरसह त्याठिकाणी हजेरी लावली.या घटनेत कोणालाही दुखापत नाही. खाडीच्या पाण्यात बुडालेली कार इमर्जन्सी टेंडरच्या सहाय्याने ओढून बाहेर काढण्यात आली असून कापूरबावडी पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आली आहे.