भिवंडी: भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून या मोकाट कुत्र्यांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. मनपा प्रशासनाच्या या दुर्लक्षित कारभारामुळे भटक्या, मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांकडून नागरिकांना चावा घेण्याच्या अनेक घटना शहरात घडत असतानाच पद्मानगर परिसरातील तीन वर्षीय चिमूरडीला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी घडली आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान पद्मानगर परिसरासह शहरातील भटक्या मोकाट कुत्र्यांवर मनपा प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांनी मनपा प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
चांदनीकुमारी असे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तीन वर्षीय चिमुरडीचे नाव आहे. पद्मानगर येथील राजुचाळ परिसरात खेळत असतांना तिच्यावर कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे. पद्मानगर येथे मोठया प्रमाणात मोकाट, मटक्या प्राण्याचा सुळसुळाट पसरला असून मागील दोन महिन्यापासून राजुचाळ परिसरात एका भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने थैमान घातलेले असून, पिसाळलेला कुत्रा दिवसरात्र परिसरातील लहान मुले गाळेतील विद्यार्थी महिला, जेष्ठ नागरीकांच्या अंगावर जावून चावा घेण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे परिसरातील ये-जा करणाऱ्या नागरीकांना पिसाळलेल्या कुत्र्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने पद्मानगर परिसरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांसह शहरातील सर्वच भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा मनपा प्रशासनाने योग्य तो लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांनी मनपा आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.