ठाण्यात ‘भावी पंतप्रधान’ म्हणून झळकले बॅनर, काँग्रेसकडून राहुल गांधींना शुभेच्छा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 12:03 PM2023-06-20T12:03:42+5:302023-06-20T12:03:55+5:30
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी ठाणे शहरात भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे बॅनर ठाणे शहरात झळकले होते.
ठाणे : काही महिन्यांपूर्वी ठाण्यात ‘भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर लावण्यात आले होते. त्यानंतर आता ठाणे शहरात काँग्रेसने भावी पंतप्रधान म्हणून लावलेले बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा १९ जूनला वाढदिवस असतो. अनोख्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर शहरात झळकले आहेत. त्या बॅनरवर राहुल गांधींचा भावी पंतप्रधान म्हणून उल्लेख करीत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यामुळे शहरात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी ठाणे शहरात भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे बॅनर ठाणे शहरात झळकले होते. तसेच गेल्या काही दिवसांपासून भावी मुख्यमंत्री म्हणून राज्यातील विविध भागांत राष्ट्रवादी काँग्रेस असो वा काँग्रेस अथवा मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपापला नेता मुख्यमंत्री व्हावा या उद्देशाने भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले होते. मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवर त्यांना ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत. आता काँग्रेसने देशाचे भावी पंतप्रधान अशी बॅनरबाजी केली. हे बॅनर ठाणे जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या बाहेरील सिग्नलवर तसेच मुस रोडवर लावलेले आहेत. या बॅनरमुळे काँग्रेस चर्चेत आली. हे बॅनर काँग्रेस पक्षातील दिवंगत माजी आमदार क्रांती कोळी समर्थक असलेले ठाणे महापालिका शिक्षण मंडळ उपसभापती नंदकुमार मोरे यांनी लावले आहेत.
मोरे यांनी लावलेल्या त्या बॅनरवर ‘नफरत छोडो, भारत जोडो’ असा उल्लेख करण्यात आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मध्यंतली कष्टकरी, शेतकरी, बेरोजगार युवकांचा आवाज, भारताचे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी कन्याकुमारी ते काश्मीर ‘भारत जोडो’ यात्रा काढली. काँग्रेस पक्षाचे निर्भीड नेते, भावी पंतप्रधान राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असा उल्लेखही ब’नरवर करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसने जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या बाहेरील सिग्नलवर तसेच मुस रोडवर लावलेल्या या बॅनरमुळे चांगली चर्चा रंगली आहे.
काँग्रेस हा सर्वात जुना व सर्वाधिक काळ देशाचे नेतृत्व केलेला पक्ष आहे, राहुल गांधी हे या पक्षाचे नेते आहेत म्हणून या पक्षात भावी पंतप्रधान म्हणून राहुल गांधी यांच्याकडे पाहणे हा कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोन योग्यच आहे.
- सचिन शिंदे, मुख्य प्रवक्ते,
काँग्रेस ठाणे शहर